BWF Malaysia Open 2024 : भारताची अव्वल पुरुष दुहेरी बॅडमिंटन जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी गुरुवारी क्वालालंपूर येथे मलेशिया ओपन 2024 बॅडमिंटन स्पर्धेच्या 16 व्या फेरीत विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
बॅडमिंटन क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या या भारतीय जोडीने लुकास कॉर्व्ही आणि रोनन लाबर या जागतिक क्रमवारीत 36व्या क्रमांकावर असलेल्या फ्रेंच जोडीचा 39 मिनिटे चाललेल्या लढतीत 21-11,21-18 असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला.
India’s Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty enter men’s doubles quarterfinals at Malaysia Open Super 1000 badminton tournament in Kuala Lumpur. #BWF pic.twitter.com/x4xwRcIqJl
— Press Trust of India (@PTI_News) January 11, 2024
सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी BWF सुपर 1000 टूर्नामेंटच्या 16व्या फेरीत त्यांच्या सामन्याची सुरुवात चांगली केली होती कारण पहिल्या गेममध्ये त्यांनी फ्रेंच जोडीला फारशी संधी दिली नाही आणि सलग 9 गुण मिळवून 10-1 अशी आघाडी घेतली होती. मात्र, कोरवी आणि लबर यांनी 14-4 वरून 14-11 अशी गुणसंख्या घेऊन आघाडीचे अंतर कमी करण्यात यश मिळवले, परंतु आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या जोडीने पुन्हा एकदा खेळावर ताबा मिळवला आणि पहिला गेम 21-11 ने जिंकला.
फ्रेंच जोडीने दुसऱ्या गेमच्या सुरुवातीला भारतीय जोडीला काहीशी टक्कर दिली आणि 11-6 अशी पाच गुणांची आघाडी घेतली. मात्र, ब्रेकनंतर सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी आपली लय परत मिळवली आणि 39 मिनिटांत सामना जिंकला.
याआधी बुधवारी सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांनी इंडोनेशियाच्या मुहम्मद शोहिबुल फिकरी-मौलाना बगास यांचा सलग दोन गेममध्ये पराभव करत आगेकूच केली होती.