“भारताचे पतमानांकन वाढले, जीएसटी सुधारणेनंतर शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 81,273, निफ्टी 24,876 वर बंद”

मुंबई – एस अँड पी कंपनीने गेल्या आठवड्यात भारताचे पतमानांकन वाढविले आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी क्षेत्रात क्रांतिकारी सुधारणाची घोषणा केली. यामुळे कराचे केवळ 5 आणि 18% हे दोनच टप्पे शिल्लक राहणार आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी जागतिक आणि अनिश्चित परिस्थितीकडे दुर्लक्ष करून जोरदार खरेदी केली. विशेषतः वाहन आणि ग्राहक उपयोगी वस्तू निर्माण करणार्या कंपन्यांच्या शेअरची जास्त खरेदी झाली. त्यामुळे शेअर निर्देशांक उंचावले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 676 अंकांनी वाढून 81,273 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 245 अंकांनी म्हणजे एक टक्क्याने उसळून 24,876 अंकावर बंद झाला. दिवाळीपूर्वी बर्याच ग्राहक उपयोगी वस्तू स्वस्त होणार आहेत. अशा परिस्थितीत निर्यातीतील तूट देशांतर्गत बाजारपेठेतून भरून निघण्याची शक्यता आहे.
आज झालेल्या खरेदीचा फायदा मोठ्या प्रमाणात मारुती सुझुकी, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिन्सर्व, महिंद्रा, हिंदुस्थान युनिलिव्हर, ट्रेन्ट या कंपन्यांना झाला. मात्र सध्याच्या तेजीच्या वातावरणातही आयटीसी, ईटर्नल, टेक महिंद्रा, लार्सन अँड ट्यूबरो या कंपन्यांच्या शेवटच्या भावात घट नोंदली गेली.
जीओजी इन्व्हस्टमेंट या कंपनीचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, रशिया -युक्रेन तणाव कमी होण्याची शक्यता आहे. परदेशी पतमानांकन संस्थांनी भारताची आणि भारतातील बड्या कंपन्यांची पत वाढविली आहे. त्यातच जीएसटीचे टप्पे कमी होणार आहेत.
यामुळे केवळ कर भरणे सोपे होणार नाही तर एकूणच उद्योग करणे सोपे होणार आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत आतापर्यंत कुंपणावर बसून असलेल्या किरकोळ गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली.
जागतिक अस्थिरतेमुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून विक्री होत असले तरी ही तूट देशातील संस्थागत गुंतवणूकदार भरून काढत आहेत. या गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळेल असे या गुंतवणूकदारांना वाटत आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गुरुवारी 1,926 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. जागतिक बाजारात आज संमिश्र वातावरण होते. भारताच्या दृष्टिकोनातून सकारात्मक बाब म्हणजे खनिज तेलाचे दर सध्या 66 डॉलर या पातळीवर आहेत. त्याचबरोबर इतर चलनाच्या तुलनेत डॉलर कमकुवत होत असल्यामुळे रुपयाची घसरण थांबलेली आहे.




