भारताचे स्वतःचे AI मॉडेल फेब्रुवारीपूर्वी तयार होणार

नवी दिल्ली – भारताचे स्वतःचे सार्वभौम कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल फेब्रुवारीच्या अगोदर तयार होणार असल्याची घोषणा माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने केली आहे. फेब्रुवारीत कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रावर शिखर परिषद होणार आहे. त्या अगोदर हे मॉडेल तयार होईल आणि त्याचे सादरीकरण परिषदेत केले जाईल असे माहिती तंत्रज्ञान सचिव एस कृष्णन यांनी सांगितले.
या क्षेत्रात भारत मागे पडला असल्याचा आरोप केला जात असला तरी प्रत्यक्षात भारताने कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी 10 हजार युनिट जीपीयू क्षमतेच्या उद्दिष्टापेक्षा 38 हजार जीपीयू क्षमता गाठली आहे. अशा परिस्थितीत डिसेंबर अगोदर प्रायोगिक मॉडेल उपलब्ध होईल आणि फेब्रुवारीअगोदर प्रत्यक्ष मॉडेल उपलब्ध होईल असा दावा कृष्णन यांनी केला.
या क्षेत्रातील 12 कंपन्यांना भारत सरकार मदत करत असून यातील दोन कंपन्यांचे काम अखेरच्या टप्प्यात आले आहे. असे असतानाच कृत्रिम बुद्धिमत्तेचा दुरुपयोग कसा रोखला जाईल यासंदर्भातही भारत सरकार कंपन्यांच्या मदतीने यंत्रणा विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे.





