नवी दिल्ली – करोना लसीकरणात भारताने नवा विक्रम नोंदवला आहे. देशभरात सोमवारी (16 ऑगस्ट) नागरिकांना लसींचे 88 लाख 13 हजारांवरून अधिक डोस देण्यात आले. एका दिवसात देण्यात आलेल्या डोसची ती संख्या आजवरची सर्वांधिक ठरली आहे.
देशातील नागरिकांना आतापर्यंत देण्यात आलेल्या डोसचा आकडा 56 कोटींच्या घरात पोहचला आहे. देशातील प्रौढ नागरिकांपैकी 45 टक्के जणांना आतापर्यंत एक डोस देण्यात आला आहे. तर, 13 टक्के प्रौढांचे पूर्ण लसीकरण (दोन्ही डोस) झाले आहे.
देशातील लसीकरण मोहिमेने गती घेतली असतानाच नव्याने आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या दैनंदिन संख्येतील घट दिलासादायी ठरत आहे. सोमवार सकाळपासून 24 तासांत देशभरात नव्या 25 हजार 166 बाधितांची नोंद झाली. ती वाढ 154 दिवसांतील सर्वांत कमी ठरली आहे.
देशातील सक्रिय बाधितांची संख्या घटून 3 लाख 69 हजार 846 इतकी झाली आहे. ती संख्या 146 दिवसांतील नीचांकी ठरली आहे. एकूण बाधितांच्या तुलनेत सक्रिय बाधितांचे प्रमाण केवळ 1.15 टक्का आहे. ते प्रमाण मागील वर्षीच्या (2020) मार्चपासून सर्वांत कमी आहे.