भारताची चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट 4.4% पेक्षा जास्त होणार नाही; अनुराधा ठाकूर यांनी व्यक्त केले मत

नवी दिल्ली : भारत सरकार चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट 4.4% च्या आत रोखणार आहे. आतापर्यंत उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार ही तूट 4.4% पेक्षा जास्त होणार नाही, असे मत आर्थिक व्यवहार विभागाच्या सचिव अनुराधा ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. ठाकूर यांनी सांगितले की, दरम्यानच्या काळामध्ये देशातील आणि परदेशातील परिस्थिती बिघडत चालली आहे. मात्र असे असले तरी आर्थिक शिस्तीबाबत केंद्र सरकार कसलेही तडजोड करणार नाही असा आपला इतिहास आहे.
त्यामुळे वर्षाअखेर अर्थसंकल्पात ठरविल्याप्रमाणेच भारताची वित्तीय तूट 4.4% च्या आत राहील याबद्दल सरकारला विश्वास आहे. एकीकडे वित्तीय तूट मर्यादित ठेवत असतानाच पहिल्या तिमाहित भारताचा विकास दर तब्बल 7.8% इतका भरल्याबद्दल ठाकूर यांनी समाधान व्यक्त केले. आर्थिक शिस्तीमुळे अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होत नसतो हे भारताने दाखवून दिले आहे, असे त्या म्हणाल्या.
आगामी काळात जीएसटी दर कपात झाल्यास देशांतर्गत विक्री वाढेल. त्यामुळे कंपन्या अधिक भांडवली गुंतवणूक करू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावर्षी देशभर चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रातून अर्थव्यवस्थेला अधिक योगदान मिळेल असे गृहीत धरण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.





