Economy News Updates: भारतीय अर्थव्यवस्थेला वेग…. स्वावलंबी संरक्षण, शेअर बाजाराची घोडदौड, सोन्याची चमक… Trade Warमध्येही भारत मजबूत

भारत संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होणार
नवी दिल्ली – भारताचं संरक्षण क्षेत्र आता स्वयंपूर्णतेच्या मार्गावर असून निर्यात क्षमताही वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित एका संरक्षणविषयक परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. मोदी सरकारने सैन्यदलाच्या आधुनिकीकरणावर नेहमीच भर दिला आहे, असं ते म्हणाले. संरक्षण क्षेत्राला अधिक आत्मनिर्भर बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने 2025 हे वर्ष ‘सुधारणा वर्ष’ म्हणून घोषित केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. या परिषदेत लष्करी क्षेत्रातली तांत्रिक प्रगती, धोरणात्मक सुधारणा, स्वदेशी उत्पादन, निर्यात आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर चर्चा होणार असून वरिष्ठ लष्करी अधिकारी, सरकारी प्रतिनिधी, संशोधक आणि उद्योजक यात सहभागी होत आहेत.
————
फोक्सवॅगनचा भारतीय बाजारपेेठेवर भर
मुंबई, – फोक्सवॅगन कंपनी वेगाने वाढणारर्या भारतीय बाजापेठवर अधिक लक्ष देणार असल्याचे फोक्सवॅगन इंडियाचे ब्रँड संचालक आशिष गुप्ता यांनी सांगीतले. फोक्सवॅगन इंडियाने भारतीय बाजारपेठेसाठी विशेष एसयूव्ही ऑल न्यू टिगुआन आर-लाइनचे अनावरण केल्यानंतर ते म्हणाले की, फोक्सवॅगनची जगभरात सर्वाधिक विकली जाणारी ही गाडी टिगुआनच्या तिसर्या पिढीतील आहे. जर्मन अभियांत्रिकीद्वारे विकसित केलेल्या या गाडीत 5 स्टार सुरक्षा आहे. याच्या डिलिव्हरी 23 एप्रिल 2025 पासून भारतभरातील फोक्सवॅगन डीलरशिप्समध्ये सुरू होतील.
————–
केळी उत्पादनात भारत अग्रेसर
जळगाव – जागतिक केळी उत्पादनाच्या 30 टक्के केळ्यांचं उत्पादन भारतात होतं. मात्र भारतीयांमध्ये आवश्यक त्या प्रमाणात केळी खाल्ली जात नाही. सर्वांगीण दृष्टीनं विचार केल्यास केळी हे सहज उपलब्ध होणारं, पौष्टीक फळ असून, त्याचा आहारात रोज समावेश केल्यास आरोग्य उत्तम राहिल असा सल्ला ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील यांनी दिला.
अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघाच्या वतीनं जळगाव जिल्ह्यातल्या रावेर इथं जागतिक केळी दिन साजरा करण्यात आला. केळ्यांमधल्या पोषणमूल्यांबाबत जागरूकता वाढून त्याचं सेवन वाढावं यासाठी केळी दिवस साजरा केला जातो. जागतिक स्तरावर केळ्यांना महत्वाचा अन्नघटक मानलं जातं. कुपोषण दूर करण्यासाठी, खेळाडूंना स्फूर्ति देण्यासाठी केळ्यांचा उपयोग होतो. दररोज ‘दोन केळी खा आणि निरोगी रहा’ हा आरोग्याचा मंत्र समजून घेतला पाहिजे, असं आवाहन पाटील यांनी जागतिक केळी दिनानिमित्त केलं.
—————
अर्थव्यवस्था साडेसहा टक्के दराने वाढणार
नवी दिल्ली- जगभरात मंदीचं सावट असतानाही या वर्षात भारताची अर्थव्यवस्था मात्र साडेसहा टक्के दराने वाढणार असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यापार आणि विकास अहवालात म्हटलं आहे. विकासाला चालना देणारा खर्च आणि वित्तीय धोरणामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठं पाठबळ मिळत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. याच काळात चीनची अर्थव्यवस्था 4.4 टक्के दराने वाढत असून अमेरिकेची आणि युरोपियन महासंघाची अर्थव्यवस्था 1 टक्के दराने वाढत आहे. फ्रांस, जर्मनी आणि इटलीच्या अर्थव्यवस्था एका टक्क्याहून कमी दराने वाढत असून जपानच्या वाढीचा दर अर्ध्या टक्क्यापर्यंत खाली येऊ शकतो, असं या अहवालात म्हटलं आहे.
————
शेअर निर्देशांकांची घोडदौड कायम
डॉलर खचल्याने परदेशी गुंतवणूक वाढली
शेअर निर्देशांकात झाली दोन टक्के वाढ
मुंबई – अमेरिकेने सुरू केलेल्या व्यापार युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर जास्त परिणाम होणार नसल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच अमेरिका- जपान व्यापार बोलणी सकारात्मक पद्धतीने सुरू झाली आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असल्यामुळे डॉलर कमकुवत होत आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात खरेदी करू लागले आहेत. अशा परिस्थितीत सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजार निर्देशांकात भरीव वाढ झाली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,508 अंकांनी म्हणजे दोन टक्क्यांनी वाढून 78,553 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 414 अंकांनी वाढून 23,851 अंकावर बंद झाला. 2,427 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. 1,522 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. गेल्या चार दिवसात सेन्सेक्स 4,706 अंकांनी म्हणजे 6.37 टक्क्यांनी वाढला आहे. या कालावधीत निफ्टी 1,452 अंकांनी म्हणजे 6.48 टक्क्यांनी वाढला आहे.
अमेरिकेच्या अस्थिर व्यापार धोरणामुळे अमेरिकेत मंदी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सहा मुख्य चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर इंडेक्स सध्या 99.24 अंकावर आहे. एक महिन्यापूर्वी हा निर्देशांक 110 अंकाच्या पुढे होता. अशा परिस्थितीत डॉलर केंद्री उत्पादनातील जागतिक गुंतवणूक कमी होऊन भारतासारख्या देशात वाढत आहे. रुपया बळकट होत असल्यामुळे भारतीय शेअर बाजारात केलेली गुंतवणूक या गुंतवणूकदारांना अधिक परतावा देऊ शकणार आहे.
अमेरिकन निर्देशांक पिछाडीवर
अमेरिकेच्या व्यापार धोरणामुळे अमेरिकेला फटका बसत आहे. अमेरिकन शेअर बाजाराचे निर्देशांक बुधवारी कमी पातळीवर बंद झाले. युरोपियन बाजारातही नकारात्मक वातावरण होते. मात्र जपान, दक्षिण कोरिया, चीन, हाँगकाँग, तैवान येथील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. आयात शुल्क धोरणामुळे अमेरिकेचे नुकसान होत असल्यामुळे अमेरिका माघार घेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
सर्व क्षेत्राचे निर्देशांक वाढले
शेअर बाजारात झालेली खरेदी व्यापक स्वरूपाची होती. त्यामुळे मिडकॅप, स्मॉल कॅपसह सर्व क्षेत्राचे निर्देशांक वाढले. भारताची स्थूल अर्थव्यवस्था भक्कम असल्याची आकडेवारी बाहेर येत आहे. भारताचा विकास दरही जगात सर्वात जास्त राहणार असल्याबद्दल मतैक्य निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक वाढत आहे असे सांगितले जाते.
लेमनमार्केट या कंपनीचे विश्लेषक सतीश चंद्र अलूरी त्यांनी सांगितले की, अमेरिकेचे निर्देशांक कोसळल्यानंतर सकाळी शेअर बाजारात नकारात्मक वातावरण होते. मात्र नंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्वाच्या बाबी ध्यानात घेऊन देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांनी खरेदी केली. भारतीय कंपन्यांचे चांगले ताळेबंद जाहीर होतील, असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यातल्या त्यात खासगी बँकांचे शेअर खरेदी करण्याकडे गुंतवणूकदारांचा ओढा होता. बँकांनी ठेवीवरील व्याजदरात कपात केल्यामुळे बँकांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे बँकांच्या शेअरची खरेदी झाली.
00000000
चौथ्या तिमाहीत इन्फोसिसच्या नफ्यात घट
मुंबई – अमेरिकेने सुरू केलेल्या व्यापार युद्धामुळे अमेरिकेत मंदी निर्माण होऊन अमेरिकेतील कंपन्या कमी सॉफ्टवेअरचा वापर करण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे चौथ्या तिमाहीत भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या ताळेबंदावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
चौथ्या तिमाहीत इन्फोसिस कंपनीला लागलेला नफा 11.7 टक्क्यांनी कमी होऊन 7,033 कोटी रुपये झाला आहे. मात्र या तिमाहीत कंपनीचा महसूल वाढवून 40,925 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत कंपनीला 7,969 कोटी रुपयांच नफा झाला होता.
मात्र कंपनी भविष्याबाबत आशावादी असून आगामी काळात कंपनीचा महसूल साडेचार ते पाच टक्क्यांनी वाढण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे. तिमाही पातळीवर कंपनीचा नफा 3.3 टक्क्यांनी वाढला तर महसूल दोन टक्क्यांनी कमी झाला.
सरलेल्या पूर्ण वर्षात कंपनीचा नफा 1.8 टक्क्यांनी वाढून 26,713 कोटी रुपये इतका झाला आहे. तर महसूल 6.06 टक्क्यांनी वाढून 1,62,990 कोटी रुपये इतका झाला. कंपनीकडे सध्या 4.1 अब्ज डॉलरची गंगाजळी असून कर्मचार्यांची संख्या 3,23,578 वर गेली आहे.
विप्रोचा शेअर कोसळला
विप्रो कंपनीने निराशाजनक ताळेबंद जाहीर केल्यामुळे या कंपनीचा शेअर चार टक्क्यांनी कमी होऊन 236 रुपये 90 पैसे या पातळीवर गेला. आगामी वर्षात या कंपनीचा महसूल 3.5 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली होती. व्यापार युद्धामुळे अमेरिकेला होणार्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे महसूल कमी होणार आहे.
000000
व्यापारातील अडथळ्यातून भारत योग्य मार्ग काढेल
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विश्वास
मुंबई – सध्या जगातील बरेच विकसित देश बचावात्मक व्यापार धोरण स्वीकारत आहेत. यामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम होणार आहे. मात्र या परिस्थितीतून भारत योग्य धोरणाचा अवलंब करून आणि दीर्घ पल्ल्याची गुंतवणूक आकर्षित करून मार्ग काढेल, असा विश्वास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे.
जागतिक पातळीवर व्यापार युद्ध वाढत चालले आहे. त्याचबरोबर अनेक देशांचा परस्परांशी संघर्ष वाढला आहे. याचा अंदाज भारताला होता. त्यामुळे भारताने अंतर्गत अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यावर गेल्या काही वर्षापासून भर दिला आहे. आगामी काळातही अशाच प्रकारचे धोरण भारत स्वीकारणार आहे.
मुंबई शेअर बाजाराच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना सीतरामन यांनी सांगितले की, भारताचे देशातील आणि परदेशातील परिस्थितीवर बारीक लक्ष असून, योग्य वेळी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.
व्यापार युद्धाच्या काळात भारतीय शेअर बाजारांनी चोख कामगिरी बजावली आहे. विशेषता किरकोळ गुंतवणूकदारांनी शेअर बाजारावर विश्वास आबाधित ठेवून निर्देशांकांची जास्त हानी होऊ दिलेली नाही, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
त्याचबरोबर भारतातील संस्थागत गुंतवणूकदारांनीही शेअर बाजारावर जास्त नकारात्मक परिणाम होणार नाही याची काळजी घेतली. त्यामुळे भारतीय शेअर बाजार परकीय गुंतवणुकीवर जास्त प्रमाणात अवलंबून राहणार नाही असे त्या म्हणाल्या. अमेरिकेने व्यापार युद्ध सुरू केल्यापासून अमेरिकेसह इतर शेअर बाजारावर जेवढा परिणाम झाला तेवढा भारतीय शेअर बाजारावर झालेला नाही या बाबीकडे त्यांनी लक्ष वेधले.
000000000
भारताचा विकासदर सर्वाधिक राहणार
फिट्चच्या जागतिक मूल्यांकनात भारत सर्वात पुढे
नवी दिल्ली – अमेरिकेने सुरू केलेल्या व्यापार युद्धामुळे आणि इतर प्रश्नांमुळे जागतिक विकास दरावर परिणाम होणार आहे. अशा परिस्थितीत सर्वच देशाचे विकास दर कमी होणार आहेत. मात्र भारताचा विकासदर अशा परिस्थितीत सर्वात जास्त पातळीवर राहणार असल्याचे मूल्यांकन फिट्च रेटिंग या संस्थेने केले आहे.
चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर अंदाज 6.4% असा व्यक्त करण्यात आला आहे. या अगोदर केलेल्या अंदाजापेक्षा तो 0.10 टक्क्यांनी कमी आहे. मात्र व्यापार युद्धाचे परिणाम रेंगाळणार असल्यामुळे पुढील आर्थिक वर्षाचा विकासदर कमी पातळीवर राहील असे सांगण्यात आले.
व्यापार युद्धामुळे जागतिक घडामोडी इतक्या वेगाने वाढत आहेत की, या अंदाजात वेळोवेळी सुधारणा करणे गरजेचे होणार आहे. शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळत आहेत. नागरिक अधिक बचत करून भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे विविध देशाच्या विकासदरावर आणि अर्थकारणावर नकारात्मक परिणाम होणार आहे.
यावर्षी जागतिक विकास दर दोन टक्क्यापेक्षा कमी होणार आहे. 2009 नंतर प्रथमच जागतिक विकास दर इतक्या कमी पातळीवर जाणार आहे. भारताबाबत या संस्थेने म्हटले आहे की 2024-25 मध्ये भारताचा विकासदर 6.4% तर 2025-26 मध्ये 6.2% या पातळीवर राहील. 2026-27 मध्ये भारताचा विकास दर 6.3% राहील असे या संस्थेला वाटते.
यावर्षी अमेरिकेचा विकास दर 1.2 टक्के, चीनचा विकासदर 4% किंवा त्यापेक्षा कमी, तर युरोपचा विकास दर 1% पेक्षा कमी पातळीवर राहील. 1909 नंतर अमेरिकेचे सर्वसाधारण आयात शुल्क प्रथमच 23 टक्के इतक्या उच्च पातळीवर गेले आहे. तर चीन विरुद्धचे आयात शुल्क 100 टक्क्यापेक्षा जास्त राहणार आहे. जागतिक अर्थकारणावर परिणाम होत आहे.
लघु उद्योग आणि वित्त पुरवठयावर व्याख्यान
पुणे – येथील पद्मशाली चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेनं लघु उद्योग आणि वित्त पुरवठा या विषयावर पद्मश्री मिलिंद कांबळे आणि विद्याधर अनासकर यांचं व्याख्यान शनिवार 19 एप्रिल रोजी संध्याकाळी आयोजित केले आहे.
डेक्कन जिमखाना इथे पद्मशाली चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या ट्रेंडी टॉक मालिकेतल्या या व्याख्यानात दलित चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष आणि केंद्र व राज्य सरकारच्या औद्योगिक विषयक अनेक समित्यांचे सदस्य पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे हे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगसंदर्भात शासकीय योजना, अनुदान आणि त्यासाठीचे नियम, निकष आणि उपलब्धता यावर मार्गदर्शन करणार आहेत. तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक, विद्या सहकारी बँक अध्यक्ष, उद्यम सहकारी बँक या व इतर बँकांचे संस्थापक संचालक. सहकार आणि अर्थतज्ज्ञ विद्याधर तथा बाळासाहेब अनासकर यांचे उद्योग, व्यापार यासाठीच्या राष्ट्रीयकृत अन् सहकारी बँकांच्या योजना, वित्त पुरवठा आणि सवलती, सबसिडी यावर मार्गदर्शन करणार आहेत, असे पद्मशाली चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे चेअरमन, पेशवाई या उद्योग समूहाचे संचालक राहुल येमूल यांनी सांगितले
000000000
रिझर्व बँकांनी वाढविली सोन्याची खरेदी
भारतीय रिझर्व बँकेकडे 879 टन सोन्याचा साठा
मुंबई – करोनानंतर जागतिक चलन बाजारात कमालीची अस्थिरता निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत भारतासह विविध देशाच्या रिझर्व बँकांनी सोन्याची खरेदी वाढविलेली आहे. भारतीय रिझर्व बँकेकडे आता 97 अब्ज डॉलरचे 879 टन सोने आहे. जगातील इतर रिझर्व बँकाही सोने खरेदी वाढवीत आहेत. त्यामुळे सोन्याचे दर विक्रमी पातळीवर आगेकलच करीत आहेत.
सोने खरेदीत जगातील रिझर्व बँकांच्या रांगेत भारतीय रिझर्व बँक दुसर्या क्रमांकावर आहे. जानेवारी व फेब्रुवारीत रिझर्व बँकेने 2.8 टन सोन्याची खरेदी केली. तर 2024 मध्ये रिझर्व बँकेने तब्बल 72.6 टन सोने खरेदी केले आहे.
जगातील रिझर्व बँका गेल्या दहा वर्षांपासून सोने खरेदी वाढवीत आहेत. गेल्या तीन वर्षात रिझर्व बँकांनी प्रत्येक वर्षी 1,000 टन सोने खरेदी केला आहे. या वर्षाच्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात रिझर्व बँकांनी 44 टन सोन्याची खरेदी केली. त्यामुळे अर्थातच सोन्याचे दर सध्या 3,300 डॉलर प्रति औंस या विक्रमी पातळीवर गेले आहेत. गेल्या एक वर्षांमध्ये सोन्याचा दर 40% वाढला आहे. 2025 मध्ये आतापर्यंत सोन्याचा दर 25% वाढलाआहे. 2024 मध्ये 28 टक्क्यांनी तर 2023 मध्ये 15 टक्क्यांनी दर वाढला आहे.
गेला एक वर्षांमध्ये सोन्याच्या दरात 1,000 डॉलर प्रति औंस वाढ झालेली आहे. ही एका वर्षात झालेली सर्वाधिक वाढ आहे. अमेरिकेने व्यापार युद्ध सुरू केल्यामुळे अमेरिकेसह जागतिक बाजारात मंदीची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचा डॉलर कमकुवत होत आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या कर्जरोख्यांची विक्री वाढली आहे. अशा परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक साधन म्हणून सोन्याची खरेदी वेगाने वाढत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
2019 मध्ये भारतीय रिझर्व बँकेकडे असलेल्या एकूण परकीय चलन साठ्यात सोन्याचे प्रमाण केवळ 6.7% होते. दरम्यानच्या काळात रिझर्व बँकेने सोन्याची खरेदी वाढविली आहे. त्यामुळे 2024 मध्ये रिझर्व बँकेकडे असलेल्या परकीय चलनात सोन्याचे प्रमाण 11.4% वर गेले आहे. 2025 मध्ये यापेक्षा जास्त वेगाने एकूण परकीय चलन साठ्यातील सोन्याचे प्रमाण वाढत आहे.
सोन्याचा दर नव्या विक्रमी पातळीवर
गुरुवारी दिल्ली सराफात सोन्याचा दर 70 रुपयांनी वाढून 98,170 रुपये प्रति दहा ग्रॅम या विक्रमी पातळीवर गेला. चांदीचा दर मात्र 1,400 रुपयांनी कमी होऊन 98 हजार रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. मंदीमुळे आगामी काळात महागाई वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत महागाईचा सामना करण्यासाठी सोन्याचा उपयोग होईल असे जगभरातील गुंतवणूकदारांना वाटत आहे.
0000000
शुल्क वाढीला भेदून रुपया वधारला
मुंबई – अमेरिकेने आयात शुल्क वाढवून जागतिक व्यापार युद्ध सुरू केल्यामुळे रुपयाच्या मूल्यावर परिणाम झाला होता. मात्र आता हा परिणाम संपुष्टात आला असून रुपयाचा दर डॉलरच्या तुलनेत वेगाने वाढत आहे. गुरुवारी रुपयाचा भाव 27 पैशांनी वाढून 85.37 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला.
अमेरिकेच्या धोरणामुळे अमेरिकेचा डॉलर कमकुवत होत असल्यामुळे परदेशी गुंतवणूक भारतात वाढत चालली आहे. यामुळे रुपयाचा दर वाढला. दरम्यानच्या काळामध्ये खनिज तेलाच्या कम किमती कमी होत आहेत. त्यामुळेही रुपयाला चांगलाच आधार मिळत आहे.
एकीकडे रुपया वधेरत असताना डॉलर वेगाने कमकुवत होत आहे. जगातील सहा मुख्य चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर इंडेक्स सध्या 99.24 अंकावर आहे. एक महिन्यापूर्वी हा निर्देशांक 110 अंकाच्या पुढे होता. डॉलर कमकुवत होत असल्यामुळे डॉलरकेंद्री वित्तीय साधनातील परकीय गुंतवणूक कमी होत आहे. परदेशी गुंतवणूकदार गेल्या तीन दिवसापासून भारतीय शेअर बाजारात खरेदी करीत असून बुधवारी या गुंतवणूकदारांनी 3,936 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. यामुळे रुपयाचे मूल्य वाढण्यास मदत होत आहे. मात्र तरीही रिझर्व बँकेचे चलन बाजाराकडे बारीक लक्ष असल्याचे सांगण्यात येते.
000000
ट्रम्प यांचे फेडरल रिझर्व्हशी भांडण वाढले
फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांना काढून टाकण्याची धमकी
व्यापार युद्धामुळे अमेरिकेत मंदी निर्माण होण्याचा पावेल यांचा इशारा
वॉशिंग्टन – अमेरिकेची रिझर्व बँक असलेल्या फेडरल रिझर्वचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी अमेरिकेने न भूतों भविष्यती आयात शुल्क लावल्यामुळे अमेरिकेत रोजगार निर्मिती कमी होऊन महागाई भडकण्याचा धोका निर्माण झाल्याचा इशारा पुन्हा दिला आहे. अशा परिस्थितीत व्याजदर कपातीवर विचार करणे शक्य होणार नसल्याचे पावेल यांनी सांगितले आहे. मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ताबडतोब व्याजदर कपात करण्याची सूचना केली असून जर पॉवेल यांनी आपली सूचना ऐकली नाही तर त्यांना टर्मिनेट करण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अपेक्षापेक्षा कितीतरी जास्त आयात शुल्काची घोषणा केली आहे. त्याचबरोबर या घोषणामध्ये कसलीही सलगता नाही. यामुळे जागतिक चलन आणि शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम होत आहेत. याचा परिणाम अमेरिकन अर्थव्यवस्थेवर होणार आहे. अशा परिस्थितीत फेडरल रिझर्वला अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्यामध्ये व्याजदर कपात न करणे या उपायाचा समावेश असल्याचे पॉवेल यांनी शिकागो येथे अर्थतज्ञाच्या परिषदेत बोलताना सांगितले.
सध्या तरी अमेरिकेची अर्थव्यवस्था पुरेशी बळकट आहे. मात्र जर व्यापार युद्ध थांबविले गेले नाही तर परिस्थिती वेगाने नकारात्मक होऊ शकेल असे पॉवेल यांनी स्पष्ट केले.
पॉवेल यांच्या या वक्तव्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावर पॉवेल यांच्या वक्तव्याविरोधात पोस्ट केली. पॉवेल गरज नसताना नकारात्मक परिस्थिती असल्याचे सांगत आहेत. त्यांच्या अनेक बाबी या अगोदर खोट्या ठरल्या आहेत. त्यांनी व्याजदर कपातील प्रत्येक वेळी उशीर केला आहे. खनिज तेल स्वस्त झाले आहे. किराणा माल स्वस्त झाला आहे. त्याचबरोबर टेरीफ वाढविल्यामुळे अमेरिका श्रीमंत होणार आहे. असे असताना पॉवेल व्याजदर कपात करत नाहीत. जर पॉवेल यांनी आपल्या कामकाजात सुधारणा केली नाही तर त्यांच्या टर्मिनेशनवर लवकर विचार करावा लागेल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.





