नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणतात त्याप्रमाणे भारताची अर्थव्यवस्था मुळीच मृतप्राय झालेली नाही. सध्या भारत जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्था स्वाभिमानाने उभा आहे. लवकरच भारताची अर्थव्यवस्था तिसर्या क्रमांकाची होणार आहे, असे स्पष्टीकरण केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केले आहे. अमेरिकेने लावलेल्या 25% आयात शुल्काचा भारतावर किमान परिणाम होईल या दृष्टिकोनातून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचबरोबर अमेरिकेशी व्यापार कराराबाबत चर्चा करताना भारत राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. ट्रम्प यांच्या निर्णयावर संसदेत भाष्य करताना गोयल यांनी सांगितले की, भारत सरकार देशातील शेतकरी निर्यातदर, लघुउद्योजक आणि उद्योजकांच्या संघटनांची यासंदर्भात चर्चा करीत आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारतावर किमान परिणाम व्हावा यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचबरोबर अमेरिकेच्या निर्णयाचा भारतावर नेमका किती परिणाम होणार आहे याचे मूल्यांकन करण्यात येत आहे. ट्रम्प यांनी भारताने अमेरिकन कृषी उत्पादने आणि दुग्धोेत्पादने विनाशुल्क स्वीकारावी यसाठी हट्ट धरलेला होता. मात्र भारतातील शेतकर्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी भारताने अमेरिकेला याबाबत स्पष्ट नकार दिला. भारताने इतर देशाशी करार करतानाही हीच भूमिका घेतली होती. इतर देशांनी भारताची भूमिका मान्य केलेली आहे, याकडे गोयल यांनी लक्ष वेधले. भारत ज्या वस्तू जास्त मनुष्यबळाचा वापर करून तयार करतो त्या वस्तूवर अमेरिकेने शुल्क लावू नये असा भारताने आग्रह केला होता. यामध्ये चर्मवस्तू, दागिने, वाहनाचे सुटे भाग इत्यादीचा समावेश होता. मात्र अमेरिकेने या वस्तूवरील शुल्क कमी करण्यास नकार दिला आहे. भारताची आगेकूच रशियाप्रमाणेच भारताची अर्थव्यवस्था मृत म्हणजे डेड इकॉनोमी आहे, या ट्रम्प यांच्या वक्तव्यावर बोलताना गोयल म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था अनेक वर्षापासून सर्वात वेगाने वाढणारे अर्थव्यवस्था आहे. दहा वर्षात भारत जगातील अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आला आहे. भारत सरकारने यासाठी आवश्यक सुधारणा करण्याबरोबरच भारतातील शेतकरी, लघु उद्योजक आणि विविध क्षेत्रातील उद्योगांनी केलेल्या खडतर परिश्रमामुळे भारताने ही कामगिरी केली आहे.