इतर देशापेक्षा भारताची आर्थिक परिस्थिती उत्तम – एन. चंद्रशेखरन

मुंबई – विविध देशांदरम्यान चालू असलेले युध्द, जागतिक व्यापार युद्ध इत्यादी कारणामुळे जागतिक आर्थिक परिस्थिती खराब आहे. त्यामुळे अनेक देशावर नकारात्मक परिणाम होत आहेत. मात्र अशा परिस्थितीतही भारताची परिस्थिती तुलनेने चांगले आहे, असे मत टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी व्यक्त केले आहे.
गेल्या काही वर्षापासून जागतिक आर्थिक वातावरण खराब आहे. नजीकच्या भविष्यामध्ये या परिस्थितीत फारसा फरक पडण्याची शक्यता कमी आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखरन यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व देण्यात येत आहे. टाटा कंजूमर प्रॉडक्ट्स या कंपनीच्या अध्यक्षपदावरही चंद्रशेखरन आहेत. त्यांनी कंपनीच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार क्षेत्रामध्ये बरीच अनिश्चितता निर्माण केली आहे.
मात्र या घडामोडीचा टाटा समूहातील कंपन्यावर फारसा परिणाम होणार नाही.
चंद्रशेखर म्हणाले की भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी केवळ दोन टक्के मूल्याच्या वस्तू भारत अमेरिकेला निर्यात करतो. अमेरीकेच्या निर्यातीवर जरी काही प्रमाणात परिणाम झाला तरी भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नावर याचा फारसा परिणाम होणार नाही हे स्पष्ट दिसून येते.
त्याचबरोबर टाटा समूहावरही अमेरिकेच्या व्यापार युद्धाचा जास्त नकारात्मक परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सुचित केले. चंद्रशेखरन यांनी सांगितले की, भारताने आपली मूलभूत अर्थव्यवस्था कमालीची बळकट केली आहे. त्यामुळे भारताचा विकासदर अनेक दशकापासून उच्च पातळीवर आहे. तो कायम राहण्याची शक्यता आहे.
भारतात तरुणांची संख्या जास्त आहे. या तरुणांना काम मिळवून देण्यामध्ये देशातील सरकार आणि खासगी क्षेत्र बर्याच प्रमाणात यशस्वी झाले आहे. भारताची स्थूल अर्थव्यवस्था बळकट आहे. त्याचबरोबर ती अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकार विविध क्षेत्रातील मूलभूत सुधारणा नेटाने पुढे नेत आहे. यामुळे भारताचा विकास दर जास्त आहे आणि तो जास्तच पातळीवर राहण्याची शक्यता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
तरुण ग्राहकांची संख्या वाढली
ग्राहक उपयोगी वस्तू क्षेत्रात तरुण ग्राहकांची संख्या वेगाने वाढत आहे. एकूण ग्राहकांपैकी 76 टक्के ग्राहक 2030 पर्यंत तरुण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे टाटा कंजूमर प्रॉडक्ट कंपनी तरुणांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती उत्पादने विकसित करीत आहे. या ग्राहकांना प्रत्यक्ष दुकानाबरोबरच ई-कॉमर्सच्या माध्यमातून या वस्तू पूरवाव्या लागणार आहेत. या दृष्टिकोनातून ही कंपनी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.



