एन. चंद्रशेखरन यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदी 2032 पर्यंत मुदतवाढ; ट्रस्टींचा एकमताने निर्णय

मुंबई – टाटा सन्स च्या अध्यक्षपदी एन चंद्रशेखरन यांना तिसर्या वेळी मुदतवाढ देण्याचा निर्णय टाटा ट्रस्टस्ने घेतला आहे. त्यामुळे चद्रशेखरन टाटा सन्सच्या अध्यक्षपदावर 2032 पर्यंत राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
टाटा सन्सच्या अगोदरच्या नियमानुसार कार्यकारी पदावरील व्यक्तीला 65 वर्षानंतर निवृत्त व्हावे लागत होते. मात्र यावेळी चंद्रशेखरन यांना अपवाद करण्यात आला आहे. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावर एन चंद्रशेखरन यांची नियुक्ती 2017 मध्ये करण्यात आली होती.
त्यांची सध्याची मुदत 2027 मध्ये संपणार होती. 2027 यावर्षी ते 65 वर्षाचे होणार होते. मात्र ही मुदत संपण्यापूर्वीच टाटा ट्रस्टच्या संचालकांनी आणखी पाच वर्षे मुदत वाढ दिली आहे. 2032 मध्ये एन चंद्रशेखरन 70 वर्षाचे होतील.
टाटा सन्सकडून सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी इत्यादी महत्त्वाच्या प्रकल्पाचे कामकाज सुरू आहे. या प्रकल्पात निरंतरता राहावी याकरिता ही मुदतवाढ ट्रस्टीनी दिली असल्याचे समजले जाते.
काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार 11 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली नाही. या संदर्भातील निर्णय अगोदरच झाला होता. मात्र इतर काही विषयावर ट्रस्टीदरम्यान मतभेद असल्याचे समजले जाते. चंद्रशेखरन यांच्या मुदतवाढीला मात्र कोणीही विरोध नाही केला नसल्याचे बोलले जाते.



