India’s diesel exports rise: जगात इंधन टंचाई, पण भारताची ‘डिझेल कमाई’ जोरात! 7 वर्षांचा विक्रम गाठला
India's diesel exports rise: अमेरिकेने भारताला रशियाकडून खनिज तेल खरेदी करण्याची परवानगी दिलेली आहे. सध्या खनिज तेलाचे दर वाढले असल्यामुळे याचा रशियाला आणि तेल शुद्धीकरण कंपन्यांनाही फायदा होत आहे.

India’s diesel exports rise: एकीकडे आखातातील पेच प्रसंगामुळे जागतिक पातळीवर इंधन टंचाई निर्माण झाली असतानाच भारतातील तेल शुद्धीकरण कंपन्यांनी पश्चिम आशियातील देशांना मार्च महिन्यामध्ये केलेली डिझेलचे निर्यात सात वर्षाच्या उच्चांकी पातळीवर गेली आहे.
भारतात तेल शुद्धीकरण कंपन्या मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. या कंपन्या कच्च्या खनिज तेलापासून पेट्रोल, डिझेल आणि इतर उत्पादने तयार करतात. जागतिक पेचप्रसंगावेळी भारतातील तेल शुद्धीकरण कंपन्यांची निर्यात युरोप आणि आशिया खंडातील इतर देशांना होत असते. सध्या या तेल कंपन्यांनी युरोपऐवजी पश्चिम आशियातील देशांना निर्यात वाढविली आहे. त्याचबरोबर सध्या खनिज तेलाचे दर वाढल्यामुळे आणि युद्धाची परिस्थिती असल्यामुळे भारतातील डिझेल निर्यात करणार्या तेल शुद्धीकरण कंपन्यांना जास्त प्रीमियम मिळत असल्याचे दिसून येते.
अमेरिकेने भारताला रशियाकडून खनिज तेल खरेदी करण्याची परवानगी दिलेली आहे. सध्या खनिज तेलाचे दर वाढले असल्यामुळे याचा रशियाला आणि तेल शुद्धीकरण कंपन्यांनाही फायदा होत आहे.
मार्च महिन्यामध्ये तब्बल 7.45 दशलक्ष पिंप डिझेल आशिया खंडातील देशांनातेल शुद्धीकरण कंपन्याकडून देण्यात आले. त्यातील निम्मे डिझेल सिंगापूरला पाठविण्यात आले असल्याची माहिती या क्षेत्राकडे लक्ष ठेवणार्या संस्थांनी दिली आहे. यातील 90% डिझेल रिलायन्स इंडस्ट्रीजकडून पुरविण्यात आले.
सध्या भारतातील तेल शुद्धीकरण कंपन्यांना रशियाबरोबरच इतर पर्यायी स्त्रोतातून बाजार भावाने खनिज तेल मिळत आहे. याच भावाच्या आधारावर या कंपन्या शुद्ध केलेले पेट्रोलियम पदार्थ इतर देशांना निर्यात करीत आहेत.





