India – Pak Attack : भारताचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर; लाहोरमध्ये केला ड्रोन हल्ला

भारत-पाकिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. भारताच्या जम्मू, जैसलमेर आणि अमृतसरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचे प्रयत्न भारताने हाणून पाडले आहेत. यानंतर भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानातील लाहोरमध्ये ड्रोन हल्ला केला आहे.
पाकिस्तानाकडून रात्री ९ च्या आसपास जम्मू आणि आसपासच्या भागात ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाकिस्तानने जम्मूच्या आरएसपुरा आणि अरनिया सेक्टरमध्ये घुसखोरी करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय जवानांनी तो त्वरित उधळून लावला. त्यानंतर राजौरी आणि पुंछमध्येही पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला, पण भारतीय जवानांनी त्यांना चोख उत्तर दिले.
तर दुसरीकडे सीमेवर पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरू आहे. पठाणकोट, उधमपूर आणि कुपवाडा जिल्ह्यातल्या सीमाभागात हा गोळीबार सुरु आहे. पठाणकोट हवाई अड्ड्यावर मोठ्या प्रमाणात पाकिस्तानचे ड्रोन घिरट्या घालत होते. भारतीय लष्कराच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी काही मिनिटांत सगळे ड्रोन निष्क्रिय केले.
काही दिवसांपूर्वी भारतातील पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता. याला भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवून जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानाश्रित दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून भारताने पाकचे चांगलेच कंबरडे मोडले.
पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला झाल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. यावेळी तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत परिस्थितीचा आढावा घेत आहेत.





