भारताचा दरवर्षी पाकशी सामना

दुबई – परंपरागत प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान यांच्यात दरवर्षी लढत व्हावी; तसेच जर द्विपक्षीय मालिकेत सहभागाला भारत सरकारची परवानगी नसेल तर इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांनाही सामील करत चौरंगी मालिका आयोजित केली जाऊ शकते, असा प्रस्ताव पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष व माजी कसोटीपटू रमीज राजा यांनी आयसीसीकडे दिला आहे.
दरवर्षी चार देशांची टी-20 आंतरराष्ट्रीय चौरंगी मालिका आयोजित करण्याची इच्छा राजा यांनी बोलून दाखवली असून, याबाबतच्या प्रस्तावावर आयसीसीचे मत घेऊन मगच या तीनही देशांच्या क्रिकेट मंडळाकडे सविस्तर प्रस्ताव पाठवला जाणार आहे.
भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या चार देशांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सुपर सीरिजचा प्रस्ताव देणार असून, या मालिकेचे आयोजन रोटेशन पद्धतीने व्हावे असे आमचे प्रयत्न आहेत. यातून मिळणारा महसूल ठरावीक टक्के प्रत्येक देशाला मिळेल तसेच त्यातील काही वाटा आयसीसीलाही दिला जाईल, असे मत राजा यांनी मांडले आहे.





