IBSA World Games : भारताच्या अंध महिला संघाने रचला इतिहास

बर्मिंगहॅम :- आयबीएस जागतिक स्पर्धेत यंदा प्रथमच टी-20 क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्यात भारताच्या अंध मुलींच्या संघाने इतिहास रचताना ऑस्ट्रेलियाचा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. पुरुष गटात मात्र, पाकिस्तानने भारतीय संघाचा पराभव करत सुवर्णपदक मिळवले.
भारताच्या अंध मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 9 गडी राखून पराभव केला व विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत पहिल्यांदाच टी-20 क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता व भारताच्या अंध महिला संघाने पहिल्याच वर्षी विजेतेपदाचा मान मिळवत इतिहास रचला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 षटकात 8 गडी गमावून 114 धावा केल्या. त्यावेळी पावसामुळे खेळ थांबवावा लागला व भारतासमोर 115 धावांचे आव्हान ठेवले गेले.
त्याचा पाठलाग करताना भारताने 3.3 षटकात 1 गडी गमावून 43 धावा केल्या होत्या. त्यावेळी पुन्हा पावसामुळे खेळ थांबवावा लागला. तसेच पाऊस सुरूच राहिल्याने खेळ पुढे होणार नसल्याचे स्पष्ट झाले व सरस धावगतीच्या आधारावर भारतीय संघाला विजेता घोषित करण्यात आले.





