भारतीय मजदूर संघटना करणार आठवडाभर आंदोलन

नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरुद्ध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीत भारतीय मजदूर संघटना आठवडाभर सरकार जगाओ आंदोलन करणार आहे. हे आंदोलन 24 ते 30 जुलै दरम्यान देशभर होईल.
या संघटेच्या पदाधिकाऱ्यांची वेबिनारवर बैठक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. असंघटित क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न वाढत आहेत. अस्थाई कामगारांचा प्रश्न वाढत आहे. बऱ्याच कंपन्यातील कामगारांना वेळेवर पगार मिळत नाही. गाजावाजा न करता नोकर कपात होत आहे. अनेक राज्यात कामाचे तास वाढविण्यात आले आहेत. विविध सरकारी कंपन्यांचे बेसुमार खासगीकरण होत आहे. या विरोधात हे आंदोलन असल्याचे संघाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात कोल इंडियाच्या कामगारांनी राष्ट्रीय पातळीवर केलेले आंदोलन यशस्वी झाले आहे. त्या आंदोलनाला आमचा पाठींबा आहे. जर सरकारने कामगारांचे प्रश्न सोडविले नाहीत तर आगामी काळात प्रखर आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.





