Indian Tourism : बांगलादेशासोबत निर्माण झालेल्या राजनैतिक तणावाचा परिणाम भारताच्या पर्यटन (Indian Tourism) क्षेत्रावर दिसून आला आहे. वर्ष २०२५ मध्ये भारतात येणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत ९.४ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली असून, ही घसरण प्रामुख्याने बांगलादेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या अत्यल्प संख्येमुळे झाल्याचे अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पर्यटन मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये एकूण ९०.२ लाख विदेशी पर्यटकांनी भारताला भेट दिली. भारत आणि बांगलादेशातील संबंध ऑगस्ट २०२४ पासून ताणले गेले आहेत. तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव भारताने बांगलादेशी नागरिकांच्या व्हिसावर निर्बंध लादले होते. याचा परिणाम असा झाला की, २०२४ मध्ये १७.५ लाख असणारी बांगलादेशी पर्यटकांची संख्या २०२५ मध्ये तब्बल ७३.३ टक्क्यांनी घसरून अवघी ४.६६ लाखांवर आली आहे. विशेष म्हणजे, जर बांगलादेशातील पर्यटकांना वगळले, तर इतर देशांतून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत प्रत्यक्षात ४.२५ टक्क्यांची सकारात्मक वाढ दिसून आली आहे. जागतिक स्तरावर भारतासाठी अमेरिका हा पर्यटनाचा सर्वात मोठा स्रोत कायम असून, २०२५ मध्ये १८.१ लाख अमेरिकन पर्यटकांनी भारताला पसंती दिली. त्यापाठोपाठ ब्रिटनमधून १०.७ लाख, ऑस्ट्रेलियातून ५.४ लाख आणि कॅनडातून ५.३ लाख पर्यटकांचे आगमन झाले. ही आकडेवारी दर्शवते की, विकसित देशांमधील पर्यटकांचा ओढा भारताकडे अद्यापही कायम आहे. भारतीयांच्या परदेश प्रवासात वाढ दुसरीकडे, भारतीय नागरिकांच्या परदेश प्रवासात मात्र मोठी वाढ झाली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत सुमारे ३.२७ कोटी भारतीयांनी विदेश दौरे केले, जे २०२४ च्या तुलनेत ५.९ टक्क्यांनी अधिक आहेत. भारतीयांच्या पसंतीचा विचार करता संयुक्त अरब अमिराती हे २६.३ टक्क्यांसह अव्वल स्थानी राहिले असून सौदी अरेबिया, थायलंड, अमेरिका आणि सिंगापूर या देशांनाही भारतीयांनी मोठी पसंती दिली आहे. परदेशात जाणाऱ्या भारतीयांमध्ये ४३.५ टक्के लोक सहलीसाठी, ३४.१ टक्के लोक नातेवाईकांना भेटण्यासाठी आणि १४.६ टक्के लोक व्यवसायानिमित्त बाहेर गेल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.