टोकियो – ऑलिंपिकसाठी टोकियोत येणाऱ्या भारतीय खेळाडूंसाठी एक खूषखबर तेथे आधी पोचलेल्या खेळाडूंनी दिली आहे. ऑलिंपिकमध्ये एकमेव पात्र ठरलेली वेट लिफ्टिंग खेळाडू मीराबाई चानू हिने आपला फोटो ट्विट करून ही माहिती दिली आहे. भोजनालयात सर्व प्रकारचे भारतीय खाद्यपदार्थ उपलब्ध होणार आहेत. भारतीय ऑलिंपिक संघटनेने काही खेळाडू शाकाहारी असल्याची कल्पना संयोजकांना दिली होती. त्यानुसार ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व प्रथम येथे दाखल झालेल्या खेळाडूंनी जेव्हा सर्वप्रथम भोजनालयात प्रवेश केला, तेव्हा त्यांच्यासाठी भेंडीची सुकी बाजी, वांग्याची रस भाजी, पनीर, छोले भटुरे, दाल, रोटी आणि नान या शाकाहारी पदार्थाबरोबर बटर चिकन असा मेनू वाट बघत होता. हा सगळा मेनू पाहून भारतीय खेळाडूंचा आनंद ओसंडून वहात होता. वेटलिफ्टिंग प्रशिक्षक विजय शर्मा यांनी येथील खाण्याचे कौतुक केले. रियोपेक्षा येथील खाणे चांगले असल्याचे सांगण्यास ते विसरले नाहीत. नेमबाज सौरभ चौधरी, मनु भाकर, अभिषेक वर्मा यांच्यासह अनेक खेळाडू शाकाहारी आहेत. अशा खेळाडूंचे काय होणार याची चिंता आयओएला होती. कारण, आतापर्यंत शाकाहारी असणाऱ्या भारतीय खेळाडूंना आपल्या सोबत भारतीय जेवण बरोबर घेऊन जावे लागत होते. काही भारतीय खेळाडूंनी ही अडचण बोलून दाखवली होती. कोविड संसर्गाचा धोका लक्षात घेता प्रत्येक आघाडीवर सावधानता घेण्याच्या सूचना आयओसीने केल्या आहेत. – भोजनालयात खेळाडू एकत्र जेवू शकणार नाहीत – जेवणा दरम्यान कुणीच बोलू शकणार नाहीत – आहार समितीने मर्यादा घालून दिल्या आहेत – त्यानुसार भोजनालय २४ तास खुले राहणार