मुंबई – अपेक्षेप्रमाणे अमेरिकेच्या रिझर्व बँकेने व्याजदरात पाव टक्क्याची कपात केली आहे. त्याचबरोबर डिसेंबरपूर्वी आणखी दोन वेळा व्याजदर कपात होणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे जागतिक शेअर बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले. अशा परिस्थितीत भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सलग तिसर्या दिवशी वाढण्यास मदत झाली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 320 अंकांनी वाढून 83,013 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 93 अंकांनी म्हणजे 0.37% यांनी वाढून 25,423 संघावर बंद झाला. विश्लेषकांनी सांगितले की, एकीकडे अमेरिकेने व्याजदर कपात केली असल्यामुळे जागतिक भांडवलपुरवठा वाढणार आहे. त्याचबरोबर अमेरिका आणि भारतादरम्यान व्यापार कराराबाबत चर्चा चालू झाली आहे. त्यामुळे तीन दिवसापासून शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत आहेत. माहिती तंत्रज्ञान आणि औषधी क्षेत्राच्या कंपन्यांचे शेअर वधारले. कारण या क्षेत्रातून अमेरिकेला निर्यात वाढण्याची शक्यता आहे. मात्र बांधकाम आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री करून गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतला. झोमॅटो, सन फार्मा, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, एफसीएल टेक्नॉलॉजी, हिंदुस्तान युनिलिव्हर, पॉवर ग्रीड, आयटीसी, अदानी पोर्ट्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. जिओजित वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, अमेरिकेतील व्याजदर कपातीमुळे भारतातच नाही तर इतर देशातही शेअर बाजार निर्देशांकांना आधार मिळत आहे. खासगी बँका आणि छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ होताना दिसून येत आहे. भांडवली वस्तू, सेवा, इंडस्ट्रियल, ऊर्जा इत्यादी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली तर इतर क्षेत्राचे निर्देशांक वाढल्याचे दिसून आले. अर्थ मंत्रालयाचे मुख्य सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी पुढील आठ ते दहा आठवड्यामध्ये भारत आणि अमेरिकेतील व्यापार विषयावरील मतभेद बरेच कमी होतील असे सूचित केले आहे. याचाही गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर सकारात्मक परिणाम झाला. त्याचबरोबर सध्या खनिज तेलाचे दर माफक पातळीवर आहेत. तसेच परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी विक्री कमी केली आहे असे त्यांनी सांगितले.