भारतीय रेल्वेचा अभूतपूर्व उपक्रम: देशात प्रथमच रेल्वे रुळांवर सौर पॅनेल प्रणाली

वाराणसी: भारतीय रेल्वेने स्वच्छ आणि शाश्वत रेल्वे वाहतुकीच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स (BLW), वाराणसी येथे देशातील पहिली ७० मीटर लांबीची सौर पॅनेल प्रणाली रेल्वे रुळांवर स्थापित करण्यात आली आहे. या प्रणालीत एकूण २८ सौर पॅनेल्सचा समावेश असून, त्यांची एकत्रित क्षमता १५ किलोवॅट पीक (KWp) आहे.
ही प्रणाली केवळ रेल्वेसाठी ऊर्जेची बचत आणि पर्यावरण संरक्षणासाठी उपयुक्त ठरणार नाही, तर गरजेनुसार ती सहजपणे काढून पुन्हा लावता येऊ शकते. भारतीय रेल्वेच्या हरित उपक्रमांचा भाग असलेली ही प्रगत सौरऊर्जा प्रणाली रेल्वे वाहतूक अधिक पर्यावरणपूरक आणि शाश्वत बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
या प्रकल्पामुळे रेल्वेचा ऊर्जेचा खर्च कमी होईल आणि स्वच्छ ऊर्जेच्या वापराने प्रदूषणही घटेल. भारतीय रेल्वेच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाने हरित ऊर्जेच्या क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे, जो इतर क्षेत्रांसाठीही प्रेरणादायी ठरेल.




