Double Decker Train: देशात लवकरच धावणार “डबल डेकर ट्रेन’; खाली सामान अन् वर प्रवासी

Double Decker Train: डबल डेकर बसेसबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. या डबल डेकर बस मुंबईची शान आहेत. आता डबल डेकर ट्रेनही धावणार आहे. या अशा डबल डेकर रेल्वे बोगीत खाली सामान भरलेले असेल आणि वर बैठक व्यवस्था केली जाईल. भारतीय रेल्वे लवकरच अशा गाड्या सुरू करण्याच्या तयारीत आहे. म्हणजे या रेल्वेत मालाची वाहतूक करता येणार आणि प्रवाशांनाही प्रवास करता येणार आहे.
भारतात आधीच डबल डेकर ट्रेन धावत आहेत. परंतु त्यांची संख्या खूपच कमी आहे आणि ते फार कमी मार्गांवर धावतात. मात्र, या डबल डेकर गाड्यांमध्ये प्रवासीच प्रवास करतात. मालवाहतूक केली जात नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या टप्प्यात दोन गाड्या करण्याची योजना आहे.
नवीन डबल डेकर ट्रेनचा एक डबा बनवण्यासाठी 3 कोटी रुपये खर्च –
या गाड्यांमध्ये 20 डबे बसवण्यात येणार आहेत. ही डबल डेकर ट्रेन रेल्वे कोच फॅक्टरी (ICF) कपूरथला येथे तयार केली जात आहे. बेली फ्रेट संकल्पनेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या या गाड्यांच्या डब्यांची ट्रायल रन या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. ट्रेनच्या वरच्या डब्यात 46 प्रवाशांसाठी जागा असेल. त्याच वेळी, खालच्या डब्यात 6 टनांपर्यंत माल नेला जाऊ शकतो. रेल्वे कोच फॅक्टरी कपूरथलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, रेल्वे बोर्डाला तीन डिझाइन सुचवण्यात आले होते. यापैकी एक पास झाला आहे. एक कोच बनवण्यासाठी 2.70 कोटी ते 3 कोटी रुपये खर्च येईल.
डबल डेकर ट्रेन पूर्णपणे एसी –
रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये पहिली कार्गो लाइनर ट्रेन तयार होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या ट्रेनची रचना अगदी अनोखी आहे. ते पूर्णपणे वातानुकूलित असेल. या ट्रेनमध्ये विविध प्रकारच्या मालाची वाहतूक करता येते. कोरोना महामारीच्या काळात अशा गाड्यांची मोठी गरज भासू लागली होती. ज्यामध्ये सामान आणि प्रवासी दोघेही प्रवास करू शकतात. अशी ट्रेनची संकल्पना भारतात अजून अस्तित्वात नाही. ही एक नवीन सुरुवात असेल.





