नवी दिल्ली- गलवान खोऱ्यातील भारत – चीन संघर्षानंतर भारतीय रेल्वेने डेडीकेटेड फ्राईट कारीडॉरच्या कामाचे चीनी कंपनीचे कंत्राट रद्द केले आहे. या अगोदर भारतामध्ये डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर उभारण्यासंदर्भात रेल्वेच्या डेडिकेटेड फ्राईट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने बीजिंग नॅशनल रेल्वे रीसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट या कंपनीला कंत्राट दिले होते. मात्र काम योग्य गतीने होत नाही त्याच बरोबर या संदर्भातील तांत्रिक कागदपत्रे सादर केली जात नाहीत असे सांगून, हे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. या गतीने काम केल्यानंतर हे काम पूर्ण होणे शक्य नव्हते असे वाटल्यामुळे हे कंत्राट रद्द करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात भारतीय हद्दीत आलेल्या चीनी सैनिकांना हटकल्यानंतर झालेल्या संघर्षामध्ये भारताचे 20 जवान कामी आले आहेत. त्याचबरोबर चीनचे 35 जवान ठार झाले असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे देशभर चीन विरोधात वातावरण निर्मिती झालेली आहे. त्या अनुषंगाने भारतातील कंपन्या चीनशी व्यवहार पुढे ढकलू लागल्या आहेत. त्याचबरोबर चिनी वस्तूवरील बहिष्काराचे आवाहन करण्यात आले आहे. या अनुषंगाने रेल्वेने हा निर्णय घेतला असल्याचे समजले जाते. चीनमधील कंपन्यांच्या अनुषंगाने आणखी असे काही निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. भारतातील मोबाईल कंपन्यांना चीनची उपकरणे न वापरण्याच्या सूचना दूरसंचार विभाग करू शकतो असे समजले जात आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर लष्करी अधिकाऱ्यादरम्यान सुरू असलेली चर्चा काल थांबविण्यात आली होती. ही चर्चा आज पुन्हा सुरू झाली असल्याचे सांगण्यात आले. मात्र यातून कसलाही निर्णय झाला नसून आगामी काळात आणखी चर्चेची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान सरहद्दीवरील परिस्थिती तणावपूर्ण असून दोन्ही देशाचे सैनिक या ठिकाणी गस्त घालत असल्याचे सांगण्यात आले.