India – Iran : होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांच्याशी भेट; कोणत्या विषयांवर झाली चर्चा ?
India - Iran : SCO शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान यांची भेट झाली. होर्मुज तणावासह विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता.

India – Iran : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या किर्गिस्तानच्या दौऱ्यावर असून, बिश्केक येथे सुरू असलेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेदरम्यान त्यांची इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान यांच्यासोबत महत्त्वपूर्ण द्विपक्षीय भेट झाली. फेब्रुवारीमध्ये मध्य पूर्वेत युद्ध सुरू झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिली प्रत्यक्ष भेट आहे.
या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, सध्या होर्मुज सामुद्रधुनीतील तणाव आणि इराणने घातलेल्या नाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर या विषयावरही चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारतातील इराणच्या दूतावासाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, SCO शिखर परिषद आणि ‘शांघाय प्लस’ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी किर्गिस्तानमध्ये आलेले इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली.
Dr. Masoud Pezeshkian, President of the Islamic Republic of Iran, met and held talks with Shri Narendra Modi, Prime Minister of India, during the first leg of his visit to Kyrgyzstan to attend and address the Shanghai Cooperation Organisation (SCO) Summit and the Shanghai Plus… pic.twitter.com/I46TvGG7dP
— Iran in India (@Iran_in_India) August 31, 2026
‘इराणला युद्ध नको, पण आक्रमणाला उत्तर देऊ’ –
बिश्केकला रवाना होण्यापूर्वी पेजेशकियान यांनी इराणला युद्ध नको असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, कोणत्याही आक्रमणाला इराणकडून ताकद आणि दृढनिश्चयाने प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. प्रादेशिक अस्थिरता सर्व देशांसाठी नुकसानकारक असल्याचे सांगत त्यांनी आर्थिक आणि सुरक्षाविषयक उद्दिष्टांसाठी परस्पर समन्वयाची गरज व्यक्त केली.
आर्मेनियाच्या पंतप्रधानांचीही भेट –
SCO परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिन्यान यांचीही भेट घेतली. यावेळी संरक्षण, अर्थव्यवस्था, औषधनिर्मिती, विज्ञान-तंत्रज्ञान, संस्कृती आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रांतील द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा झाली. पश्चिम आशियातील परिस्थितीसह प्रमुख प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
भारत-आर्मेनिया संबंध अधिक व्यापक आणि मजबूत करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याच्या भारताच्या भूमिकेचा मोदी यांनी पुनरुच्चार केला.
पुतिन यांच्यासोबतही होणार भेट –
पंतप्रधान मोदी यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक प्रस्तावित आहे. याशिवाय, किर्गिस्तानचे राष्ट्राध्यक्ष सादिर जापारोव यांच्या विशेष निमंत्रणावरून मोदी ‘विश्व नोमॅड गेम्स’च्या सहाव्या आवृत्तीच्या अधिकृत उद्घाटन समारंभालाही उपस्थित राहणार आहेत.




