Indian Idol 16 Winner: इंडियन आयडल 16 चा विजेतेपदाचा मुकुट ज्योतिर्मयी नायकच्या शिरावर; ‘इतक्या’ लाखांचे बक्षीस जिंकत ठरली चॅम्पियन
Indian Idol 16 Winner या हंगामातील अंतिम फेरीत ज्योतिर्मयी नायक, तनिष्क शुक्ला आणि मनराज वीर सिंह हे तिघे स्पर्धक पोहोचले होते. तिन्ही स्पर्धकांनी आपल्या सुरेल आवाजाने आणि उत्कृष्ट सादरीकरणाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

Indian Idol 16 Winner: अनेक महिन्यांच्या रंगतदार स्पर्धेनंतर आणि दमदार गायकीच्या सादरीकरणानंतर अखेर ‘इंडियन आयडल 16’चा विजेता जाहीर झाला आहे. या लोकप्रिय गायन स्पर्धेच्या ग्रँड फिनालेमध्ये ज्योतिर्मयी नायक हिने विजेतेपद पटकावत ट्रॉफीवर आपले नाव कोरले. विजेतेपदासह तिला 20 लाख रुपयांचे रोख बक्षीसही मिळाले. या विजयानंतर ज्योतिर्मयीवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या हंगामातील अंतिम फेरीत ज्योतिर्मयी नायक, तनिष्क शुक्ला आणि मनराज वीर सिंह हे तिघे स्पर्धक पोहोचले होते. तिन्ही स्पर्धकांनी आपल्या सुरेल आवाजाने आणि उत्कृष्ट सादरीकरणाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. मात्र अंतिम निकालात ज्योतिर्मयीने सर्वांना मागे टाकत ‘इंडियन आयडल 16’ची विजेती होण्याचा मान मिळवला. तनिष्क शुक्ला हा पहिला उपविजेता ठरला, तर मनराज वीर सिंह दुसरा उपविजेता ठरला.
विजेतेपदासोबत ज्योतिर्मयीला 20 लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. तर उपविजेते तनिष्क शुक्ला आणि मनराज वीर सिंह या दोघांनाही प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. स्पर्धेतील इतर अंतिम स्पर्धक अंशिका चोंकर आणि सुहैल सूफी यांना प्रत्येकी 3 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. स्पॉटलाइट फेरीनंतर मैस्म्मे बोसु स्पर्धेतून बाहेर पडला होता.
View this profile on Instagram
ग्रँड फिनालेचा सोहळा संगीतप्रेमींसाठी विशेष आकर्षणाचा ठरला. परीक्षक म्हणून बादशाह, कुमार सानू आणि श्रेया घोषाल उपस्थित होते. मात्र विशाल ददलानी वैयक्तिक कारणामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे कार्यक्रमात सहभागी होत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे कौतुक केले.
या अंतिम सोहळ्यात अभिनेत्री शहनाज गिल विशेष पाहुणी म्हणून सहभागी झाली होती. तिने सर्व स्पर्धकांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच ज्येष्ठ गायिका उषा उथुप यांनी आपल्या दमदार शैलीत अनेक लोकप्रिय गाणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. कुमार सानू यांनीही आपल्या गाजलेल्या गाण्यांनी वातावरण आणखी रंगतदार केले.
‘यादों की प्लेलिस्ट’ ही संकल्पना घेऊन सुरू झालेला ‘इंडियन आयडल 16’चा प्रवास ऑक्टोबर 2025 मध्ये सुरू झाला होता. जवळपास 81 भागांनंतर 26 जुलै 2026 रोजी या हंगामाचा समारोप झाला. संपूर्ण हंगामात स्पर्धकांनी विविध प्रकारची गाणी सादर करत आपल्या गायन कौशल्याची छाप पाडली.
या हंगामात श्रेया घोषाल, विशाल ददलानी आणि बादशाह यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. ग्रँड फिनाले यंदा दोन दिवसांच्या विशेष कार्यक्रमाच्या स्वरूपात सादर करण्यात आला. पहिल्या दिवशी सेलिब्रिटींचे विशेष परफॉर्मन्स आणि स्पर्धकांचा गौरव करण्यात आला, तर दुसऱ्या दिवशी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.
ज्योतिर्मयी नायकच्या सातत्यपूर्ण मेहनतीला आणि उत्कृष्ट गायकीला अखेर यशाचे फळ मिळाले. तिच्या विजयामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांनी आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले असून, या मंचामुळे अनेक नवोदित गायकांना आपली कला सादर करण्याची मोठी संधी मिळाली.





