श्रीलंकन नौदलाच्या गोळीबारातून बचावले भारतीय मच्छिमार

रामेश्वरम – श्रीलंकन नौदलाने आपल्या कुरापती चालूच ठेवत भर समुद्रात भारतीय मच्छिमारांच्या नौकांवर गोळीबार केला. मात्र, नशीब बलवत्तर असल्याने त्या हल्ल्यातून मच्छिमार बचावले.
तामीळनाडूतील मच्छिमारांचा मोठा गट गुरूवारी मासेमारीसाठी समुद्रात गेला. त्यातील काही नौका पाल्कच्या सामुद्रधुनीत गेल्या. तिथे चार नौकांवर श्रीलंकन नौदलाच्या पथकाने गोळीबार केला. सुदैवाने, त्या हल्ल्यात भारतीय मच्छिमारांना कुठली इजा पोहचली नाही.
मात्र, त्यांच्या नौकांचे गोळीबारात नुकसान झाले. त्यामुळे त्या नौका पुन्हा किनाऱ्यावर आणल्या गेल्या. मागील काही दिवसांत श्रीलंकन नौदलाने केलेल्या गोळीबाराची ही तिसरी घटना आहे. त्या नौदलाकडून भारतीय मच्छिमारांवर हल्ले होण्याच्या घटना वारंवार घडतात.
त्यासाठी भारतीय मच्छिमारांनी सागरी हद्द ओलांडल्याचा कांगावा श्रीलंकन नौदलाकडून केला जातो. भारतीय मच्छिमारांवर हल्ले होऊ नयेत यासाठी केंद्र सरकारकडून अनेकदा तो मुद्दा श्रीलंकेकडे उपस्थित केला जातो. मात्र, श्रीलंकन नौदलाच्या कुरापती थांबताना दिसत नाहीत.





