श्रीलंकन नौकेच्या धडकेमुळे भारतीय मच्छिमाराचा मृत्यू; परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केला तीव्र निषेध

नवी दिल्ली : श्रीलंकेच्या नौदलाच्या नौकेने धभारतीय मच्छिमारांच्या नौकेला धडक दिल्यामुळे एका भारतीय मच्छिमाराचा मृत्यू झाला आहे, तर एक अन्य मच्छिमार बेपत्ता झाला आहे. कचाथीवू बेटाच्या उत्तरेला पाच सागरी मैल अंतरावरआज सकाळी ही घटना घडली, असे परराष्ट्र मंत्रलायाने सांगितले. भारताने मच्छिमाराच्या मृत्यूची घटना धक्कादायक असल्याचे सांगून दुःख व्यक्त केले आहे. श्रीलंकेच्या कार्यवाहक उच्चायुक्तांना परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये बोलावण्यात आले आणि या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
आज पहाटे झालेल्या या धडकेदरम्यान बारतीय नौकेवर असलेल्या चार भारतीय मच्छिमारांपैकी एकाला आपला जीव गमवावा लागला तर दुसरा बेपत्ता आहे. दोन मच्छिमारांची सुटका करून त्यांना कानकेसंथुराई येथे किनाऱ्यावर आणण्यात आले आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
बेपत्ता भारतीय मच्छिमाराचा शोध सुरू आहे. जाफना येथील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कानकेसंथुराई येथे जाण्याचे आणि मच्छिमार व त्यांच्या कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे.





