Vijay Hazare Trophy 2024-25 : आयपीएल लिलावात UnSold, टीम इंडियातूनही बाहेर..! आता शतकांची हॅट्ट्रिक करत ‘या’ खेळाडूनं उडवून दिली खळबळ…

Mayank Agarwal in Vijay Hazare Trophy 2024-25 : भारतीय संघात एक काळ असा होता की मयंक अग्रवाल धावांचा वर्षाव करत होता, पण नंतर अशी वेळ आली की त्याला टीम इंडियातून वगळण्यात आलं. 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध बंगळुरू कसोटीत खेळल्यानंतर मयंक टीम इंडियातून बाहेर आहे. दरम्यान, आयपीएल 2025 साठी आयोजित मेगा लिलावात त्याला मोठा धक्का बसला जेव्हा तो विकला (UnSold) गेला नाही. आता मयंकने आपल्या फलंदाजीची धार दाखवत विजय हजारे ट्रॉफीमध्ये सलग 3 सामन्यात 3 शतके झळकावली आहेत.
कर्नाटकचा कर्णधार मयंकने स्पर्धेतील क गटातील पाचव्या फेरीच्या सामन्यात चमकदार कामगिरी केली आणि हैदराबादविरुद्ध शानदार शतक झळकावले. यापूर्वी त्याने अरुणाचल प्रदेश आणि पंजाबविरुद्ध शतके झळकावून संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
शतकांची हॅट्ट्रिक….
मयंकने हैदराबादविरुद्ध 95 चेंडूत शतक पूर्ण केले. 104 चेंडूत 124 धावा करून तो बाद झाला आणि त्याच्या खेळीत 15 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 111 होता. याआधी, मयंक अग्रवालने पंजाबविरुद्ध स्फोटक पद्धतीने 139 धावांची नाबाद खेळी खेळली होती, ज्यामध्ये त्याने 127 चेंडूंचा सामना केला होता, तर 17 चौकार आणि 3 षटकार मारले होते. यानंतर त्याने अरुणाचल प्रदेशविरुद्ध 45 चेंडूंत 7 चौकार आणि 7 षटकार ठोकले. 100 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. या खेळीच्या जोरावर त्यांच्या संघाने अरुणाचल प्रदेशचा 10 गडी राखून पराभव केला.
💯💯💯
Three consecutive hundreds for Karnataka captain @mayankcricket in the Vijay Hazare Trophy 2024/25#VijayHazareTrophy #MayankAgarwal pic.twitter.com/MYg00zBqo1
— Circle of Cricket (@circleofcricket) December 31, 2024
आयपीएलमध्ये संधी मिळणार का…
मयंक निःसंशयपणे या स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे, परंतु यंदाच्या आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात त्याला एकही खरेदीदार मिळाला नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की त्याची आयपीएल 2025 मध्ये खेळण्याची शक्यता पूर्णपणे संपली आहे. जर कोणताही खेळाडू दुखापतग्रस्त झाला किंवा काही कारणास्तव स्पर्धेबाहेर गेला, तर अशावेळी संबंधित दुखापतग्रस्त खेळाडूऐवजी मयंक स्पर्धेत खेळताना दिसू शकतो. मयंक आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादकडून खेळला आहे.
संघात स्थान मिळणार का…
या खेळीच्या जोरावर त्याने निवड समितीला एक संदेशही दिला आहे. आता तो टीम इंडियात पुनरागमन करणार का हे पाहायचे आहे. 50 षटकांमध्ये त्याच्या उत्कृष्ट फॉर्मसह त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्याआधी इंग्लंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठीही दावा केला आहे. आता पाहण्यासारखे आहे की, एकीकडे भारतीय संघाचे दिग्गज विराट कोहली आणि रोहित शर्मा त्यांच्या खराब टप्प्यातून जात आहेत आणि दुसरीकडे फॉर्मात असलेल्या फलंदाजांना संधी मिळते की नाही.
मयंकचे लिस्ट ए कारकिर्दीतील 17 वे शतक….
या शतकासह मयंकने आपल्या लिस्ट-ए कारकिर्दीतील शतकांची संख्या 17 वर नेली आहे. त्याने आपल्या लिस्ट-ए कारकिर्दीत आतापर्यंत 118 सामने खेळले आहेत आणि सुमारे 50 च्या सरासरीने 5,350 हून अधिक धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 17 शतके आणि 23 अर्धशतके केली आहेत. मयंकची लिस्ट-ए कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या 176 धावा आहे.
त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने त्याच्या राष्ट्रीय संघासाठी 21 कसोटी आणि पाच एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने अनुक्रमे 1 हजार 488 आणि 86 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याने 127 सामने खेळले असून 2 हजार 661 धावा केल्या आहेत. यामध्ये 13 अर्धशतक आणि एका शतकाचा समावेश आहे.





