#TeamIndia #CWC23 : विजेतेपदाचा कर्णधार रोहितला विश्वास, म्हणाला “आम्ही 12 वर्षानंतर… “

मुंबई :- भारतात येत्या गुरुवारपासून सुरु होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद भारतीय संघच मिळवेल, असा विश्वास भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केला आहे. आशिया करंडक स्पर्धेतील कामगिरी पाहता संघातील सर्वच खेळाडू भरात आहेत. त्यातच स्पर्धाही मायदेशातच होत असून त्याचा आम्हाला सर्वाधिक लाभ होणार आहे. 1983 सालानंतर भारतीय संघाने 2011 साली तब्बल 28 वर्षांनी विश्वकरंडक जिंकला होता. आता आम्ही 12 वर्षानंतर हे विजेतेपद मिळवून देऊ, असेही रोहित म्हणाला.
तिरुअनंतपुरममधील मंगळवारी (३ ऑक्टोबर) होणारा भारताचा दुसरा सराव सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला. याआधी, 30 सप्टेंबरला गुवाहाटीमध्ये इंग्लंडविरुद्धचा पहिला सराव सामनाही पावसामुळेच रद्द करण्यात आला होता. भारतीय संघाचा विश्वचषकातील पहिला सामना 8 ऑक्टोबरला चेन्नईत ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. त्यामुळे भारतीय संघ आता एकही सराव सामना न खेळता थेट एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत उतरेल.
दरम्यान, 5 ऑक्टोबर रोजी क्रिकेटच्या महाकुंभाला प्रारंभ होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी महाअंतिम सामना रंगणार आहे. विश्वचषकाचा पहिला आणि अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणार आहे. यंदाचा विश्वकरडंक दहा संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघाचे कमीतकमी नऊ सामने होणार आहेत. त्यानंतर आघाडीच्या चार संघामध्ये सेमीफायनलचे सामने होणार आहेत.
R Ashwin replaces injured Axar Patel in the 15-member squad.
We wish Axar a speedy recovery 👍 👍#TeamIndia‘s final squad for the ICC Men’s Cricket World Cup 2023 is here 🙌#CWC23 pic.twitter.com/aejYhJJQrT
— BCCI (@BCCI) September 28, 2023
एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघ – रोहीत शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल, ईशान किशन, सुर्यकुमार यादव, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, महम्मद सिराज, शार्दूल ठाकूर व महम्मद शामी.





