Satara: भारत, जगात सर्वोत्तम ह्यूमन रिसोर्स देणारा देश ठरेल

सातारा- “महाराष्ट्र हे देशातील एकमेव असे राज्य आहे की ज्या राज्यात सर्वात जास्त अनुदानित महाविद्यालये आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंजाबराव देशमुख या महामानवांच्या दूरदृष्टी व शैक्षणिक चळवळीमुळे हे शक्य झाले. बहुजन समाजाला पुढे घेऊन जाण्याचे काम या समाजसुधारकांनी केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पावनभूमीत आजही ही शैक्षणिक चळवळ चिरंतन सुरु आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी सुरू झाली असून कौशल्याच्या जोरावर भारत जगात सर्वात ह्युमन रिसोर्स देणारा देश ठरणार आहे, असे मत महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर यांनी व्यक्त केले.
पै. इस्माईल साहेब मुल्ला यांच्या ५१ व्या पुण्यतिथीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘इस्माईलसाहेब मुल्ला जीवनगौरव पुरस्कार’ या वर्षी भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांना शैलेंद्र देवळाणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी होते. कार्यक्रमास संस्थेचे व्हाइस चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, अॅड. दिलावर मुल्ला, अॅड. रवींद्र पवार, जे. के. जाधव, सचिव विकास देशमुख, सहसंचालक बच्छाव, संस्थेचे सहसचिव प्रिं. शिवलिंग मेनकुदळे, बंडू पवार, प्रिं. डॉ. राजेंद्र मोरे उपस्थित होते.
श्री. देवळाणकर म्हणाले “भारत देशामध्ये महाराष्ट्र एकमेव राज्य असे आहे की त्या राज्याने नॅक मूल्यांकन अनिवार्य केले. विद्यार्थ्याला महाविद्यालयात उच्च दर्जाच्या सोयी सुविधा मिळाव्यात, उत्तम प्राध्यापक मिळावेत, संशोधन व्हावे यासाठी देशात महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की त्यांनी अनेक महाविद्यालयांमध्ये नॅकच्या माध्यमातून उत्तम पायाभूत सुविधा निर्माण केल्या. भारत देश विकसित होण्याच्या मार्गावर आहे. देश विकसित होण्यासाठी अणु क्षेपणास्त्र यांची गरज नसून तरुण पिढीचे परफॉर्मनन्स हाच महत्त्वाचा भाग आहे.
भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले “इस्माईलसाहेब मुल्ला यांनी शिक्षण क्षेत्रात समर्पण करून आणि निष्ठेने काम केले. त्यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला ही अतिशय अभिमानाची व समाधानाची घटना आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या “कमवा आणि शिका” या योजनेतून मी सोनसळसारख्या छोट्याशा गावातून चार ते पाच किलोमीटर पायी चालून मी माझे शिक्षण पूर्ण केले. रयतमध्ये त्याग व निस्वार्थ सेवा हा उत्तम संस्कार आहे.
मानपत्राचे वाचन प्रिं. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले . प्रा. डॉ. सविता मेनकुदळे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्या डॉ. वैशाली जाधव यांनी आभार मानले.
कार्यक्रमास संस्थेचे विभागीय चेअरमन डॉ.एम.ए.शेख, डॉ. अशोक भोईटे, प्रिं. डॉ. मोहन राजमाने, प्रिं. डॉ. भारत जाधव, डॉ. अशोक भोईटे, लालासाहेब खलाटे, आजीव सभासद, आजीव सेवक, मुल्ला कुटुंबीय, रयत सेवक उपस्थित होते.
डॉ. शिवाजीराव कदम यांची रयतला पाच लाख रुपये देणगी
अध्यक्षीय मनोगतात चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी मनोगत व्यक्त केले. इस्माईलसाहेब मुल्ला पुरस्काराच्या रकमेत डॉ. शिवाजीराव कदम यांनी स्वतःचे चार लाख रुपये देऊन एकूण पाच लाख रुपये देणगी रयत शिक्षण संस्थेला देऊ केली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ.एम.ए. शेख संपादित ‘समिधा’ या ग्रंथाच्या तिसरया आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी प्रास्ताविक केले.





