Ind Vs SL : भारताचे विजयासाठी 371 धावांचं आव्हान; लंका फत्ते होणार?
गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील (Ind Vs SL) पहिला कसोटी सामना अत्यंत अटीतटीच्या वळणावर येऊन पोहोचला आहे.

Ind Vs SL : गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील (Ind Vs SL) पहिला कसोटी सामना अत्यंत अटीतटीच्या वळणावर येऊन पोहोचला आहे. पहिल्या डावात मिळालेल्या १७८ धावांच्या भक्कम आघाडीनंतरही गॉलच्या फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांची दुसऱ्या डावात दाणादाण उडाली.
अखेर भारताचा दुसरा डाव १९३ धावांवर आटोपला असून श्रीलंकेसमोर विजयासाठी (Ind Vs SL) ३७१ धावांचे कठीण आव्हान उभे राहिले आहे. आता सामन्याचा संपूर्ण फैसला भारतीय फिरकीपटूंच्या हातात असून, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२७ च्या अंतिम फेरीतील स्थान मजबूत करण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकणे अत्यावश्यक असणार आहे.
पहिल्या डावात भारताने उभा केलेला ४६२ धावांचा डोंगर आणि त्यापाठोपाठ श्रीलंकेला २८४ धावांवर गुंडाळून मिळवलेली आघाडी यामुळे भारतीय संघ मजबूत स्थितीत वाटत होता. मात्र, दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरताच भारताला मोठा धक्का बसला; सलामीवीर यशस्वी जयस्वाल पहिल्याच षटकात भोपळाही न फोडता तंबूत परतला.
या संकटातून केएल राहुल (३५ धावा) आणि देवदत्त पडिक्कल (४४ धावा) यांनी ६५ धावांची भागीदारी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. पण राहुलची विकेट पडताच मधली फळी गडगडली. शुबमन गिल अवघ्या ८ धावांवर बाद झाला. अशा नाजूक क्षणी पहिल्या (Ind Vs SL) डावात अपयशी ठरलेल्या ऋषभ पंतने संयमी पण आक्रमक खेळी करत भारतीय आशा पल्लवित ठेवल्या.
पंतने ६९ चेंडूंत ६६ धावांची झुंजार अर्धशतकी खेळी साकारून आघाडी ३७० च्या पार नेली. मात्र पंत बाद झाल्यानंतर खालच्या फळीतील फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. ध्रुव जुरेल (७), रवींद्र जडेजा (९), मानव सुथार (९), कुलदीप यादव (५) आणि प्रसिद्ध कृष्णा (२) स्वस्तात बाद झाल्याने डाव १९३ धावांवर संपला. आता सामन्यात दीड दिवसांचा खेळ शिल्लक असून, फिरकीची जादू चालवून श्रीलंकेला रोखण्याचे मोठे आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर उभे ठाकले आहे.






