Sunil Chhetri Retirement : 20 वर्षे अतुलनीय, सुनील छेत्री अखेर निवृत्त…! भारत-कुवेत सामना 0-0 ने बरोबरीत…

Sunil Chhetri Retirement : फिफा विश्वचषक 2026 च्या पात्रता फेरीतील भारत आणि कुवेत यांच्यातील सामना 0-0 असा बरोबरीत संपला. हा सामना कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर खेळला गेला आणि भारतीय कर्णधार सुनील छेत्रीच्या कारकिर्दीतील हा शेवटचा सामना होता. सामना संपल्यानंतर इतर खेळाडूंनी छेत्रीचा सन्मान केला, मात्र यादरम्यान तो भावूकही झाला तसेच सामना संपल्यानंतर, सॉल्ट लेक स्टेडियमवर सुमारे 58,000 लोकांनी त्याला स्टॅडिंग ओवेशन दिले व जल्लोषही केला.
अंतिम-18 टप्प्यात जाण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे आवश्यक होते. भारत अजूनही पुढच्या टप्प्यात जाऊ शकतो, पण त्याला इतर सामन्यांवर अवलंबून राहावे लागेल. पहिल्या आणि दुसऱ्या हाफमध्ये भारताला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या, पण एकाही संधीचा फायदा भारताला करता आला नाही. भारताचा पुढचा सामना 11 जून रोजी कतारशी होणार आहे.
भारतीय कर्णधार कुवेतचा बचाव भेदण्याचा नियमित प्रयत्न करताना दिसला, पण त्याचे सर्व प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत अयशस्वी ठरले. सामना अनिर्णित राहण्याचे प्रमुख कारण म्हणजे भारतीय संघाचा बचाव अनेक वेळा कमकुवत दिसला, त्यामुळे कुवेत अनेक वेळा गोल करण्याच्या अगदी जवळ आला. आक्रमण विभागात भारतीय संघ पुन्हा एकदा सुनील छेत्रीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असल्याचे दिसून आले.
सहकारी खेळाडूंकडून गार्ड ऑफ ऑनर..
भारताचा कुवेतसोबतचा सामना अनिर्णित राहिला असला तरी यानंतर सर्वांच्या नजरा सुनील छेत्रीवर खिळल्या होत्या. संपूर्ण भारतीय पथकाने त्याला गार्ड ऑफ ऑनरही दिला, पण या क्षणाने तो भावूक झाला. सुनीलला आपले अश्रू आवरता आले नाहीत आणि तो त्याच्या जर्सीने अश्रू पुसताना दिसला.
सुनील छेत्रीची कारकीर्द…
दरम्यान 16 मे रोजी एक्स (आधीचे ट्विटर)वर एक व्हिडीओ शेअर करत सुनील छेत्रीने निवृत्तीची घोषणा केली होती. सुनील छेत्रीने त्याच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल कारकिर्दीत 151 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 94 गोल केले. आजपर्यंतच्या इतिहासात भारतीय संघासाठी सर्वाधिक 4 हॅटट्रिक करणारा खेळाडू देखील सुनील होता. छेत्री हा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये जगातील चौथा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू होता. या यादीत पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो (128), इराणचा अली दाई (108) आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी (106) हे अनुक्रम टाॅप-3 मध्ये आहेत.


