India-US trade tensions : भारत-अमेरिका व्यापार तणाव निवळला; 15 ऑक्टोबरपासून अमेरिकेला जाणारी पोस्ट सेवा पूर्ववत सुरू

नवी दिल्ली – भारत -अमेरिकेदरम्यानचा व्यापार तणाव ऐन दिवाळीत कमालीचा निवळला आहे. 15 ऑक्टोबरपासून पोस्ट विभाग अमेरिकेला जाणार्या पार्सलसह सर्व सेवा पूर्ववत सुरू करणार आहे. अमेरिकेने भारताविरोधात 50 टक्के शुल्क लावल्यानंतर या सेवावर परिणाम झाला होता.
भारतीय पोस्ट विभागाने यासंदर्भात अधिकृत निवेदन झाली केले आहे. अमेरिकेच्या सीमा शुल्क विभागाने भारतातून येणार्या पार्सलच्या किमतीवर 50% शुल्क लावण्याचे ठरविले आहे. या शुल्कासह अमेरिकेला भारतातील पार्सल जाणार आहेत. भारतातील अनेक नागरिक अमेरिकेत राहतात. दिवाळीत भारतातून अमेरिकेला आणि अमेरिकेतून भारतात मोठ्या प्रमाणात पार्सल पाठविली जातात. आता या सेवा पूर्ववत झाल्यामुळे ही पार्सल पाठविण्यात कसल्याही अडचणी येणार नाहीत असे पोस्ट विभागाने स्पष्ट केले आहे.
भारतातून येणार्या पार्सलबाबत अमेरिकेच्या सीमा शुल्क विभागाने नकारात्मक निर्णय घेतल्यानंतर 22 ऑगस्टपासून या सेवा बंद करण्यात आल्या होत्या. आता भारतातून येणार्या पार्सलवर पार्सलच्या किमतीच्या सरसकट 50% शुल्क लावण्यात येणार आहे. विशिष्ट वस्तूंवर विशिष्ट शुल्क अशी वर्गवारी अमेरिकेकडून करण्यात आलेली नाही.
पोस्ट विभागाने हे स्पष्ट केले आहे की, बदललेल्या परिस्थितीत पोस्ट विभागाने कसल्याही चार्जेसमध्ये वाढ केलेली नाही. मुळात लघु उद्योजकांना अमेरिकेला निर्यात करता यावी यासाठी हे दर कमी ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे आगामी काळात भारतातील लघु उद्योजक पोस्टाच्या माध्यमातून निर्यातीची उत्पादने अमेरिकेला पूर्वीप्रमाणे सुरळीतरित्या पाठवू शकणार आहेत.





