India-US trade deal: भारत-अमेरिका व्यापार करार कधी होणार?

वॉशिंग्टन – भारत आणि अमेरिकेत दरम्यानची व्यापार करार बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे. दोन्ही देशाच्या वाणिज्य विभागाचे अधिकारी यावर चर्चा करीत आहेत. भारत आणि अमेरिकेबरोबरच अमेरिकेचा इतर काही मित्र देशाशी व्यापार करार दोन ते तीन आठवड्यात पूर्णत्वास जाण्याची शक्यता असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्वतः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, काही मित्र देशाबरोबर एका आठवड्यातच व्यापार करार होऊ शकेल. इतक्या कमी वेळात हा व्यापार करार कसा होईल असे पत्रकारांनी विचारले असता, ट्रम्प यांनी सांगितले की, एक आठवड्यात व्यापार करार झाला नाही तर दोन ते तीन आठवड्यात निश्चित होईल.
भारतासोबतच ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया इत्यादी देश अमेरिकेसोबत व्यापार करार करण्याच्या चर्चेत आघाडीवर असल्याचे समजले जाते. अशा परिस्थितीत या तीन आठवड्यात हा व्यापार करार होऊ शकतो असे समजले जात आहे. मात्र ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, 90 दिवसांमध्ये जर हे व्यापार करार संबंधित देशांनी केले नाहीत तर या देशाविरोधात किती आयात शुल्क लावायचे याची आकडेवारी तयार आहे.
अशा देशाविरोधात आम्ही विशिष्ट मुदतीनंतर निश्चितपणे वाढीव आयात शुल्क लावणार आहोत असे त्यांनी सांगितले. त्यांनी अगोदरच सर्वच देशाविरोधात सरसकट दहा टक्के आयात शुल्क लावले आहे. तर चीन याला अपवाद असून चीन विरोधात 145% आयात शुल्क लावण्यात आले आहे. चीन आणि अमेरिकाही यासंदर्भात अनौपचारिक पातळीवर बोलणी करीत असल्याचे बोलले जाते.
अमेरिकेच्या व्यापारा संदर्भातील संधीग्धता शक्य तितक्या लवकर दूर करावी. कारण त्याचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर आणि नागरिकावर परिणाम होत आहे, असा दबाव अमेरिकेतील उद्योजकाकडून ट्रम्प यांच्यावर वाढत असल्यामुळे व्यापार करार लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न अमेरिका करीत आहे.





