India US Trade Deal : भारत-अमेरिका ट्रेड डील अंतिम टप्प्यात; रुबिओ-जयशंकर यांची मुंबईत महत्त्वाची बैठक
India US Trade Deal : भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मुंबईत मार्को रुबिओ आणि एस. जयशंकर यांची बैठक झाली. ऊर्जा, व्यापार, संरक्षण आणि तंत्रज्ञानावर चर्चा झाली.

India US Trade Deal : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्या भारत दौऱ्याला मंगळवारी मुंबईत सुरुवात झाली. रुबिओ आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यात मुंबईतील ताज महाल पॅलेस येथे महत्त्वाची द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत व्यापार, ऊर्जा, संरक्षण, तंत्रज्ञान आणि दोन्ही देशांमधील संबंधांवर चर्चा झाली. बैठकीला भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत रुबिओ यांनी मोठे अपडेट दिले. हा करार अंतिम करण्याच्या अगदी जवळ पोहोचला असून काही मोजके मुद्दे बाकी आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच कराराबाबत चांगली बातमी मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
भारताच्या ऊर्जा धोरणावरही रुबिओ यांनी भाष्य केले. भारताने आपल्या तेलाच्या स्रोतांमध्ये विविधता आणणे योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. रशियाकडून होणाऱ्या तेल खरेदीबाबतही भारताच्या ऊर्जा गरजा लक्षात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रुबिओ यांनी भारताच्या तेल शुद्धीकरण क्षमतेचे कौतुक केले. भारताकडे जड कच्चे तेल शुद्ध करण्याची मोठी क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले. बुधवारी ते गुजरातमधील जामनगर येथे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिफायनरीला भेट देणार आहेत. तेथे उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींशीही चर्चा करणार आहेत.
दरम्यान, मुंबईत दाखल झाल्यानंतर रुबिओ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेटवे ऑफ इंडिया येथे भेट घेतली. फडणवीस यांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. दोघांनी गेटवे ऑफ इंडिया परिसराची पाहणी केली. या भेटीत मुंबईच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची माहिती रुबिओ यांना देण्यात आली.
रुबिओ यांच्या भारत दौऱ्यात व्यापार करारासोबतच ऊर्जा सुरक्षा आणि भारत-अमेरिका धोरणात्मक संबंधांना विशेष महत्त्व दिले जात आहे.





