India-US Trade Deal: भारताचे वाणिज्य विभागाचे शिष्टमंडळ चार महिन्यानंतर पुन्हा 20 एप्रिल रोजी अमेरिका भेटीवर चर्चेसाठी जाणार आहे. व्यापार करार करण्याबाबत तत्वतः मतैक्य झाले आहे. या कराराचा कायदेशीर मसुदा लवकर तयार करून तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे वाणिज्य विभागातील अधिकार्यांनी सांगितले. वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, ही चर्चा वॉशिंग्टन येथे तीन दिवस चालणार आहे. भारतीय शिष्टमडळाचे नेतृत्व दर्पण जैन हे करणार आहेत. 7 फेब्रुवारी रोजी भारत आणि अमेरिकेने व्यापार करार करणार असल्याची संयुक्त घोषणा केली होती. त्यानंतर लगेच अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाला आयात शुल्क लावण्याचा अधिकारच नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर अमेरिकेच्या विविध देशांसोबत होत असलेल्या व्यापार करार चर्चेवर याचा परिणाम झाला होता. न्यायालयाचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने अयोग्य असल्याचे सांगितले होते. दुसर्या मार्गाने विविध देशावर आयात शुल्क लावण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्याचाच एक भाग म्हणून कलम 300 एक अंतर्गत भारतासह विविध देशाविरोधात अमेरिकेने अयोग्य व्यापारासंदर्भात चौकशी सुरू केली आहे. या चौकशीचा निर्णय सकारात्मक असल्यानंतर त्या आधारावर पुन्हा ट्रम्प प्रशासनाला विविध देशाविरोधात आयात शुल्क लावता येऊ शकते. या बाबीचा दबाव आणून अमेरिका विविध देशात बरोबर स्वतःला फायदेशीर व्यापार करार करून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले जाते. हेही वाचा – शेअर बाजारातील कंपन्यांचे बाजार मूल्य पोहोचले 458 लाख कोटी रुपयांवर 7 फेब्रुवारी रोजी ठरल्याप्रमाणे अमेरिका भारतीय वस्तूवर 18% लावणार आहे. तर भारत अमेरिकन वस्तूवर शून्य टक्के आयात सुरू होणर आहे. मात्र अमेरिकेने भारताच्या स्पर्धक देशाविरोधात 18% पेक्षा जास्त शुल्क लावले आहे. त्यामुळे हा करार भारताला स्पर्धकाच्या तुलनेत अधिक फायदेशीर आहे असे वाणिज्य मंत्रालयाने वेळोवेळी सांगितले आहे. अमेरिकेच्या भारतातील राजदूतांनी एप्रिलच्या अखेरीस भारत- अमेरिका व्यापार करार होणार असल्याचे नमूद केले आहे.