भारत-अमेरिका करार अडचणीत? शिष्टमंडळ येणार उशिरा, एक ऑगस्टपूर्वी डील होणार का?

नवी दिल्ली – अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयाचे शिष्टमंडळ व्यापार कराराच्या चर्चेसाठी ऑगस्टच्या दुसर्या पंधरवड्यात भारतात येणार असल्याचे सांगण्यात येते. दोन्ही देशांनी एक ऑगस्टपूर्वी अंतरिम करार करण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. मात्र अमेरिकेचे शिष्टमंडळ आगस्टच्या दुसर्या पंधरवड्यात भारतात येणार आहे, अशा परिस्थितीत एक ऑगस्टपूर्वी हा करार होईल की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
वाणिज्य मंत्रालयाच्या अधिकार्यांनी याबाबत माहिती न देता एवढेच सांगितले आहे की, अमेरिकेचे शिषमंडळ ऑगस्ट महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यात पुढील चर्चेसाठी भारतात येईल. वॉशिंग्टन येथे गेल्या आठवड्यात दोन्ही देशांदरम्यानची चर्चेची पाचवी फेरी समाप्त झाली आहे. त्यानंतर दोन्ही देशांनी कसलेही निवेदन जारी केलेले नाही.
दोन एप्रिल रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात 26 टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा करून नंतर या निर्णयाला 90 दिवसाची म्हणजे 9 जुलै पर्यंतची स्थगिती दिली होती. त्यानंतर पुन्हा ट्रम्प यांनी या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी एक ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे. एक ऑगस्ट पूर्वी दोन्ही देशा दरम्यान अंतरीम करार होणे अपेक्षित असताना अमेरिकेचे शिष्टमंडळ आगष्टच्या दुसर्या पंधरवड्यात भारतात येणार आहे.
अनेक विषयावर मतभेद
दोन्ही देशांना करार करायची इच्छा असूनही अनेक विषयावर मतभेद असल्यामुळे याबाबत औपचारिक घोषणा झालेली नाही. अमेरिकेने करारावर चर्चा चालू असताना अॅल्युमिनियम, तांबे, पोलाद, वाहन, वाहनाचे सुटे भाग इत्यादीवर आयात शुल्क लावले आहे. या संदर्भात दोन्ही देशांदरम्यान जागतिक व्यापार परिषदेत युक्तिवाद चालू आहेत. कृषी क्षेत्र आणि इतर विषयावर दोन्ही देशादरम्यान मतैक्य होत नसल्याचे बोलले जाते.


