India US Deal । अमेरिकेने कर लादण्याची अंतिम मुदत आता जवळ आली आहे. १ ऑगस्टपासून, जगभरातील ज्या देशांनी अमेरिकेशी कोणताही वेगळा करार केलेला नाही त्यांच्यावर ते लागू होणार आहे. अलिकडेच ब्रिटन आणि जपानसह अनेक देशांनी अमेरिकेसोबत व्यापार करारांची घोषणा केली आहे. व्यापार कराराबाबत भारतासोबत गेल्या सुमारे महिनाभरापासून व्यापक चर्चा सुरू आहे, परंतु अद्याप कोणताही सकारात्मक निकाल लागलेला नाही. अशा परिस्थितीत, दोन्ही देशांमधील व्यापार कराराबाबत समस्या कुठे निर्माण झाली? अमेरिकेची अशी कोणती मागणी आहे ज्यावर दोन्ही देशांमध्ये एकमत नाही? याविषयीच जाणून घेऊ… भारत-अमेरिका व्यापार कराराला विलंब का? India US Deal । एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर म्हणाले की, “दोन्ही देशांना व्यापार करारावर आणखी वाटाघाटी करण्याची आवश्यकता आहे कारण तो अद्याप पूर्ण झालेला नाही.” ते पुढे म्हणाले की, “भारत-अमेरिका व्यापार करार खूप जवळचा वाटत असला तरी, भारताच्या पारंपारिक बाजार संरक्षणवादी धोरणामुळे तो इतका सोपा नाही”. ग्रीर यांनी,”भारताने काही क्षेत्रांमध्ये आपली बाजारपेठ उघडण्यात रस दाखवला आहे परंतु आता भारत या करारासाठी पुढे कसे जाण्यास तयार आहे. हे पाहणे बाकीचे आहे. दुसरीकडे, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल म्हणाले की, “भारत अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर वेगाने पुढे जात आहे. ते पुढे म्हणाले की, अमेरिकन पथक ऑगस्टमध्ये भारताला भेट देईल आणि प्रस्तावित व्यापार करार हा चर्चेचा पुढचा टप्पा असेल.” कुठे एकमत नाही? India US Deal । भारत आणि अमेरिका व्यापार कराराला विलंब होण्याचे एक कारण म्हणजे अमेरिकेने अॅल्युमिनियम आणि तांब्यावर लादलेले उच्च शुल्क. एकीकडे, भारताला स्टील आणि अॅल्युमिनियमवर लादलेल्या ५० टक्के आणि ऑटो क्षेत्रावर लादलेल्या २५ टक्के शुल्कातून सवलत हवी आहे. त्याच वेळी, भारत अमेरिकेला दुग्धजन्य पदार्थ आणि कृषी उत्पादनांवर सीमाशुल्कात सूट देण्याच्या बाजूने नाही, कारण त्याचा थेट परिणाम दुग्ध क्षेत्रावर होईल. याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागू शकतो. यासोबतच, केळी, लॉबस्टर, पादत्राणे, प्लास्टिक आणि हस्तकला यासारख्या वस्तूंवरील शुल्क दर अमेरिकेने कमी करावेत अशी भारताची इच्छा आहे. त्याच वेळी, अमेरिका भारतावर पेट्रोकेमिकल्स, दुग्धजन्य पदार्थ, सुकामेवा, वाहने आणि औद्योगिक वस्तूंवरील शुल्क कमी करण्यासाठी दबाव आणत आहे. २०२४ मध्ये भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय व्यापार सुमारे १२९.२ अब्ज डॉलर्स होता. यापैकी अमेरिकेने भारताला $४१.८ अब्ज किमतीच्या वस्तू निर्यात केल्या, तर भारताने अमेरिकेला $८७.४ अब्ज किमतीच्या वस्तू निर्यात केल्या. अशा परिस्थितीत, गेल्या वर्षी अमेरिकेची भारतासोबतची व्यापार तूट ४५.७ अब्ज डॉलर्स होती.