भारत-अफगाणिस्तान संबंधांना नवी दिशा: काबुलमधील ‘तांत्रिक मिशन’चे दूतावासात रूपांतर

नवी दिल्ली: भारत सरकारने मंगळवारी अफगाणिस्तानमधील आपली राजनैतिक उपस्थिती वाढवत काबुलमधील ‘तांत्रिक मिशन’चे (Technical Mission) रूपांतर पूर्ण-वेळेच्या दूतावासात (Full-fledged Embassy) करण्याचा निर्णय जाहीर केला. ऑगस्ट २०२१ मध्ये सत्तेवर आलेल्या तालिबान राजवटीला औपचारिक मान्यता न देताही, त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा भारताच्या धोरणाचा हा एक भाग आहे.
या महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा परराष्ट्र मंत्रालयाने केली. तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांच्या नुकत्याच पार पडलेल्या भारत भेटीनंतर अवघ्या एका आठवड्यातच हे पाऊल उचलण्यात आले आहे. मुत्तकी यांच्या १० ऑक्टोबरच्या भेटीनंतर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनीच भारताची राजनैतिक भूमिका काबुलमध्ये उन्नत (Upgrade) करण्याची घोषणा केली होती.
२०२१ मध्ये तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर भारताने अफगाणिस्तानमधील आपले सर्व अधिकारी परत बोलावले आणि मिशन बंद केले होती. त्यानंतर, जून २०२२ मध्ये भारताने एका मध्यम-रँकच्या राजनैतिक अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली काबुलमध्ये ‘तांत्रिक टीम’ तैनात करून आपली राजनैतिक उपस्थिती पुन्हा स्थापित केली होती.
परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, “अफगाण परराष्ट्र मंत्र्यांच्या अलीकडील भारत भेटीदरम्यान जाहीर केलेल्या निर्णयानुसार, सरकारने काबुलमधील भारताच्या तांत्रिक मिशनचा दर्जा तात्काळ प्रभावाने अफगाणिस्तानमधील भारतीय दूतावासाच्या पातळीवर आणला आहे.”
हा निर्णय परस्पर हिताच्या सर्व क्षेत्रांमध्ये अफगाण पक्षाशी आपले द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याचा भारताचा संकल्प दर्शवतो, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
काबुलमधील दूतावास भारताच्या व्यापक विकास, मानवतावादी मदत आणि क्षमता-निर्माण उपक्रमांमध्ये अधिक मोठे योगदान देण्यास सक्षम असेल, असे मंत्रालयाने नमूद केले आहे.
औपचारिक मान्यतेचा पेच कायम: चार्ज डी अफेअर्स करणार नेतृत्व
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबान राजवटीला औपचारिक मान्यता न दिल्यामुळे, काबुलमधील दूतावासाचे नेतृत्व एका चार्ज डी अफेअर्स (Charge d’Affaires) दर्जाच्या राजनैतिक अधिकाऱ्याकडे राहील. सध्या राजदूत (Ambassador) पदावर कोणाचीही नियुक्ती केली जाण्याची शक्यता नाही.
मुत्तकी यांची ९ ते १५ ऑक्टोबर दरम्यानची भारत भेट तालिबान राजवटीसोबतच्या भारताच्या संबंधांमध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली. मुत्तकी यांनी या भेटीदरम्यान पत्रकारांशी बोलताना, संबंध पुढे नेण्यासाठी अफगाणिस्तान नवी दिल्लीतील दूतावासात आपले अधिकारी पाठवेल, अशी ग्वाही दिली.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव वाढलेला असताना मुत्तकी यांनी भारताला भेट दिली. यावेळी त्यांनी अफगाण भूमीचा उपयोग कोणत्याही देशाला लक्ष्य करण्यासाठी करू दिला जाणार नाही, या आपल्या आश्वासनाचा पुनरुच्चार केला.





