भारत निर्यात करणारा प्रमुख देश होणार – सुंदर पिचाई

नवी दिल्ली – भारतात इंटरनेट वाढत आहे. त्याचबरोबर इंटरनेटचा उद्योग- व्यवसायासाठी व्यापार वाढला आहे. त्यामुळे भारत प्रमुख निर्यातदार देशापैकी एक होईल असे गुगल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी सांगितले.
गुगल फॉर इंडिया या कार्यक्रमाचे राजधानीत आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिचाई यांनी भारतातील स्टार्ट अपबरोबर तसेच उद्योजकाबरोबर संवाद साधला. भारतातील स्टार्ट अपबरोबर म्हणजे तंत्रज्ञान आधारित नव्या उद्योगाबरोबर गुगल सहकार्य करीत आहे. यासाठी 300 दशलक्ष डॉलर उपलब्ध करण्यात येणार आहेत.
त्यापैकी एक चतुर्थांश डॉलर महिलांनी सुरू केलेल्या स्टार्टअप साठी वापरण्यात येणार आहेत. भारतातच नाही तर जगामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या नियमानासाठी संबंधित देशांनी पुढाकार घेऊन योग्य नियम तयार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
100 भाषात इंटरनेट मिळणार
भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. मात्र सध्या इंटरनेट फक्त काही मर्यादित भाषेतच उपलब्ध होत आहे. भारतातील 100 भाषांत इंटरनेट उपलब्ध व्हावे याकरिता गुगल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून नवी प्रणाली विकसित करीत आहे. यामुळे गुगलवर 100 भाषांमध्ये बोलल्यास किंवा लिहिल्यास आवश्यक ती माहिती उपलब्ध होऊ शकेल असे पिचई यांनी सांगितले.
भारतात तंत्रज्ञानाचा अभूतपूर्व वापर होत आहे. गुगल छोटे उद्योग, स्टार्टअप, सायबर सिक्युरिटी, शिक्षण, कौशल्य विकास इत्यादी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आधुनिक सुविधा उपलब्ध करीत आहे. यामुळे कृषी क्षेत्र आणि आरोग्य क्षेत्रातही अमुलाग्र बदल होत आहेत. गुगलने भारतात दहा वर्षाचा डिजिटायझेशन प्रकल्प सुरू केला आहे. यासाठी दहा अब्ज डॉलर उपलब्ध करण्यात आले आहेत. या कामकाजाचा आढावा आपण भारतातील वास्तव्यात असताना घेणार आहोत.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विविध क्षेत्रात आगामी काळात वाढणार आहे. हा वापर भारतातही वाढवा याकरिता गुगल प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पिचई यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, माहीती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा याकरिता भारत आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करीत आहे. त्याचबरोबर कायद्याची चौकट तयार करीत आहे. भारताकडे आता जी -20 चे अध्यक्षपद आले आहे. याचा भारत रचनात्मक वापर करेल असे ते म्हणाले.
भारताने युनिफाईड पेमेंट सिस्टम सुरू केली आहेत. त्याचा वापर करून गुगलने भारतात गुगल- पे सुरू केले आहे. हे कमालीचे यशस्वी झाले आहे. आम्ही या अनुभवाच्या आधारावर आता पेमेंटची ही प्रक्रिया इतर देशात राबविण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे जागतिक पातळीवर पेमेंटची प्रक्रिया बदलण्यास मदत होईल.





