Tania Wins Silver : वर्ल्ड चॅम्पियनला घाम फोडला अन् भारताचा तिरंगा फडकवला! डकार युवा ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू तानियाने जिंकले रौप्यपदक
Tania Wins Silver : डकार युवा ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ७५ किलो वजनी गटातील बीच कुस्ती स्पर्धेत भारताच्या तानियाने रौप्य पदक जिंकले, मात्र अंतिम फेरीत तिला एका चिनी खेळाडूने हरवले.

Tania Wins Silver Medal In Dakar Youth Olympic Games 2026 Beach Wrestling : सेनेगलची राजधानी डकार येथे सुरू असलेल्या प्रतिष्ठित युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा २०२६ (Youth Olympic Games) मध्ये भारताची युवा महिला कुस्तीपटू तानिया हिने आपल्या अद्भूत कामगिरीच्या जोरावर देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. महिलांच्या ७५ किलो वजनी गटातील बीच रेसलिंग (Beach Wrestling) प्रकारात तानियाने अटीतटीच्या अंतिम लढतीनंतर रौप्यपदकावर (Silver Medal) आपले नाव कोरले आहे. सुवर्णपदकाच्या लढतीत चीनच्या जागतिक चॅम्पियन मल्लाने तिला पराभूत केले असले, तरी तानियाच्या या ऐतिहासिक यशाचे देशभरातून कौतुक होत आहे.
जागतिक चॅम्पियनविरुद्ध फायनलमध्ये रोमांचक झुंज; १-२ ने पराभव
सुवर्णपदकासाठी झालेल्या अंतिम लढतीत तानियाचा सामना चीनची बलाढ्य कुस्तीपटू झाओ मिन हिच्याशी झाला. झाओ मिन ही २०२५ मधील ६९ किलो वजनी गटातील वर्ल्ड चॅम्पियन राहिलेली असल्याने ही लढत सुरुवातीपासूनच अत्यंत चुरशीची ठरली. रेतीच्या आखाड्यात दोन्ही मल्लांमध्ये ताकदीची आणि तंत्राची जबरदस्त चकमक पाहायला मिळाली. तानियाने अखेरच्या सेकंदापर्यंत कडवी झुंज दिली; मात्र अत्यंत रोमहर्षक ठरलेल्या या सामन्यात तिचा अवघ्या १-२ अशा निसटत्या फरकाने पराभव झाला. सुवर्णपदक हुकले तरी तानियाने आपल्या लढाऊ बाण्याने भारताची पदक तालिकेत नोंद केली.
जर्मनी ते अमेरिकेच्या मल्लांना चारली धूळ; फायनलपर्यंतचा निर्विवाद प्रवास
A hard-fought Youth Olympic medal! 🇮🇳🥈
Taniya reflects on a hard-fought fight, pride on the podium, and a promise to come back stronger for the #LA28 💪 https://t.co/djW7U8Iqlv
— Olympic Khel ™ (@OlympicKhel) November 7, 2026
या स्पर्धेत तानिया सुरुवातीपासूनच प्रचंड आक्रमक फॉर्ममध्ये होती. तिने गट फेरीपासून उपांत्य फेरीपर्यंत सर्व प्रतिस्पर्ध्यांना निष्प्रभ केले. ग्रुप ‘बी’ मधील पहिल्या सामन्यात तिने जर्मनीच्या मिया माउरचा ३-१ ने पराभव करून धडाकेबाज सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ग्रीसच्या वासिलिकी कारावानूला एकतर्फी धूळ चारली. उपांत्यपूर्व फेरीत एस्टोनियाच्या मेरिली वेस्टरला ४-१ ने लोळवल्यानंतर, उपांत्य फेरीच्या अटीतटीच्या सामन्यात तानियाने अमेरिकेच्या मटिल्डा एन ह्रुबीचा ३-१ ने पाडाव करत दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली होती.
आफ्रिकन भूमीवर नवा इतिहास; बीच रेसलिंगचे ऑलिम्पिक पदार्पण
TANIYA WON🥈AT THE BEACH WRESTLING IN YOUTH OLYMPICS
2026 Mat🌎🥉 in 69 KG lost to 2025 Mat🌎🥇 in 69 KGZhao Min 🇨🇳 1-2 at the Youth Olympics 75 KG Final in Beach Wrestling
It was a close match and Tanya just missed the gold 🥲🥲🥲🥲🥲 https://t.co/6TA2HaV6rQ
— SPORTS ARENA🇮🇳 (@SportsArena1234) November 7, 2026
सेनेगलमध्ये आयोजित ही युवा ऑलिम्पिकची चौथी आवृत्ती असून, आफ्रिका खंडात प्रथमच ऑलिम्पिक पातळीवरील स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. विशेष म्हणजे, बीच रेसलिंग या क्रीडा प्रकाराचा प्रथमच युवा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे. केवळ ३ मिनिटांच्या वेळेत खेळला जाणारा हा खेळ अत्यंत वेगवान असतो, ज्यामध्ये आधी ३ गुण मिळवणारा किंवा प्रतिस्पर्ध्याला पूर्ण चितपट करणारा मल्ल विजेता ठरतो. या नव्या आणि वेगवान क्रीडा प्रकारात भारतासाठी पहिले पदक जिंकून तानियाने क्रीडा जगतात नवा इतिहास रचला आहे.





