India squad for Zimbabwe T20 Series : झिम्बाब्वेविरुद्ध गिलकडे नेतृत्व..! प्रमुख खेळाडूंना विश्रांती तर ‘या’ नवोदितांना मिळाली संधी, जाणून घ्या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक..

India squad for Zimbabwe T20 Series :- भारतीय संघ सध्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत खेळत आहे. याच दरम्यान, बीसीसीआयने विश्वकरंडकानंतर होत असलेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर केला आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने या मालिकेसाठी पूर्णपणे तरुण खेळाडू असलेला संघ निवडला आहे. त्याचबरोबर संघाचे कर्णधारपदही एका युवा खेळाडूच्या म्हणजेच शुभमन गिलच्या हाती दिले आहे, ज्याने अद्याप भारतीय संघाचे नेतृत्व केलेले नाही. गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या संघात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांचा प्रथमच भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
भारताच्या १५ सदस्यीय संघात ५ नवीन चेहऱ्यांना स्थान मिळाले आहे. यामध्ये चार खेळाडू असे आहेत ज्यांनी अद्याप भारतासाठी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. यामध्ये पंजाबचा अभिषेक शर्मा, आंध्रचा नितीश रेड्डी, मुंबईचा तुषार देशपांडे आणि आसामचा रियान पराग यांच्या नावाचा समावेश आहे. ध्रुव जुरेलने भारतासाठी कसोटीमध्ये पदार्पण केले पण अद्याप भारतासाठी टी-२० सामना खेळलेला नाही.
जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांना विश्रांती दिल्यानंतर, टी-२० विश्वचषकासाठी राखीव असलेले वेगवान गोलंदाज खलील अहमद आणि आवेश खान यांना १५ सदस्यीय संघात स्थान मिळाले. तर टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात संधी मिळालेल्या रिंकू सिंगचाही या मालिकेत समावेश करण्यात आला आहे.
झिम्बाब्वे मालिकेसाठी कर्णधार बनवण्यात आलेल्या गिलसमोर मोठे आव्हान असणार आहे. गिलने आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले होते. गिलच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०२४ मध्ये गुजरातचा संघ लीग टप्प्यातून बाहेर पडला आणि १४ पैकी फक्त पाच सामने जिंकण्यात यशस्वी ठरला. अशा परिस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्त्व करण्याची मोठी जबाबदारी शुबमन गिलच्या खांद्यावर असेल. या मालिकेत त्याला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करावे लागेल. या मालिकेत गिलला मोठी संधी मिळणार आहे.
Team India Head Coach : मुख्य प्रशिक्षक होण्यापूर्वी गौतम गंभीरने ठेवल्या पाच अटी, जाणून घ्या….
भारत चौथ्यांदा झिम्बाब्वेमध्ये खेळणार टी-20 मालिका
द्विपक्षीय टी20 मालिकेत झिम्बाब्वे भारताचे यजमानपद भूषवण्याची ही चौथी वेळ असेल. यापूर्वी ही मालिका 2010, 2015 आणि 2016 मध्ये खेळवण्यात आली होती. भारताने 2010 आणि 2016 मध्ये विजय मिळवला होता. त्याच वेळी, 2015 मध्ये मालिका अनिर्णित राहिली.
टी-20 मालिकेचे वेळापत्रक…
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला 6 जुलैपासून सुरुवात होणार आहे. शेवटचा सामना 14 जुलै रोजी होणार आहे. सर्व सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 4.30 वाजता होणार आहेत. हे सामने हरारे स्पोटर्स क्लब मैदानावर खेळवले जातील. झिम्बाब्वे क्रिकेटच्या निवेदनात म्हटले आहे की, या मालिकेचा प्राथमिक उद्देश द्विपक्षीय संबंध मजबूत करणे आणि दोन्ही क्रिकेट मंडळांमधील सहकार्याची भावना वाढवणे आहे.
पहिला सामना 6 जुलै(शनिवार)
दुसरा सामना 7 जुलै(रविवार)
तिसरा सामना 10 जुलै(बुधवार)
चौथा सामना 13 जुलै(शनिवार)
पाचवा सामना 14 जुलै(रविवार)
भारतीय संघ – शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद , मुकेश कुमार, तुषार देशपांडे.





