Karn Sharma Retires : विराटच्या पहिल्या कसोटीतील साथीदाराने क्रिकेटला ठोकला रामराम! सलग तीन IPL ट्रॉफी जिंकणारा एकमेव खेळाडू
Karn Sharma Retires : भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणारा २८३ वा खेळाडू आणि अनुभवी लेग-स्पिनरने वयाच्या ३८ व्या वर्षी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Karn Sharma Retires From All Forms Of Cricket Test Cap 283 : सध्या भारत आणि श्रीलंका यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना कोलंबोत खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणारा २८३ वा खेळाडू आणि अनुभवी लेग-स्पिनर कर्ण शर्माने (Karn Sharma) वयाच्या ३८ व्या वर्षी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा (Retirement) केली आहे. २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ॲडलेड कसोटीतून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या कर्णने भारतासाठी १ कसोटी, २ एकदिवसीय (ODI) आणि १ आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला आहे.
‘कुटुंब आणि बीसीसीआयचा आभारी!’; कर्ण शर्माने जाहीर केली निवृत्ती
सध्या यूपी टी-२० लीगमध्ये खेळत असलेल्या कर्णने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह देशांतर्गत क्रिकेटलाही अधिकृतपणे पूर्णविराम दिला आहे. निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना कर्ण शर्मा म्हणाला, “आता क्रिकेटमधून निवृत्त होण्याची हीच योग्य वेळ आहे. माझ्या प्रदीर्घ प्रवासात मला पाठिंबा देणारे माझे कुटुंब, बीसीसीआय (BCCI), रेल्वे, यूपीसीए, आंध्र आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे मी मनापासून आभार मानतो. यानंतर मी कोचिंग आणि क्रिकेटशी संबंधित इतर जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी उपलब्ध असेन.” कर्णच्या आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पणाचा सामना हा कर्णधार म्हणून विराट कोहलीचाही पहिलाच कसोटी सामना होता.
सलग ३ वर्षे वेगवेगळ्या संघांकडून जिंकली IPL ट्रॉफी; अनोखा इतिहास!
Karn Sharma, the legspinner who played one Test, two ODIs and one T20I for India, has retired from international and Indian domestic cricket. The Railways cricketer made the announcement on Saturday night, after a UP T20 league match between Kanpur Superstars and Meerut… pic.twitter.com/zQ12NV4G3g
— Cricinfo (@cricinfo) August 23, 2026
कर्ण शर्माच्या नावावर आयपीएलमध्ये (IPL) एक अत्यंत दुर्मीळ आणि ऐतिहासिक विक्रम नोंदवला गेला आहे. सलग तीन हंगामात तीन वेगवेगळ्या फ्रँचायझींसाठी खेळताना आयपीएल चॅम्पियन बनणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला. २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबाद, २०१७ मध्ये मुंबई इंडियन्स आणि २०१८ मध्ये चेन्नई सुपर किंग्स या तिन्ही संघांकडून खेळताना त्याने विजेतेपद पटकावले. २००९ मध्ये आरसीबीकडून आयपीएल पदार्पण करणाऱ्या कर्णने ९० आयपीएल सामन्यांत ८३ विकेट्स घेतल्या असून, २०२५ मध्ये तो मुंबई इंडियन्सकडून अखेरचा सामना खेळला होता.
१९ वर्षांची प्रदीर्घ देशांतर्गत कारकीर्द; अशी राहिली कामगिरी!
२००७ मध्ये रेल्वे संघाकडून देशांतर्गत पदार्पण करणाऱ्या कर्ण शर्माने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये (First Class) उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी केली. ९७ प्रथम श्रेणी सामन्यांत त्याने २७० विकेट्स टिपले आणि दोन शतकांच्या मदतीने २,८६६ धावा कुटल्या. याशिवाय लिस्ट-ए क्रिकेटमध्ये १५३ विकेट्स आणि १,८२७ धावा, तर टी-२० मध्ये १६८ विकेट्स व १,६०१ धावांची नोंद त्याच्या नावावर आहे. १९ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्याने रेल्वेसह विदर्भ आणि आंध्र संघांचेही प्रतिनिधित्व केले.





