भारताने रशियाकडून तेल खरेदी करणं कमी केलं; सप्टेंबरमध्ये मोठी घट

नवी दिल्ली – अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदी कमी करण्याची सूचना केली आहे. अशा परिस्थितीत सप्टेंबर महिन्यामध्ये भारताने रशियाकडून केलेली तेल खरेदी 14 टक्क्यांनी कमी होऊन 2.5 अब्ज युरो इतकी झाली आहे. रशियाकडून तेल खरेदी करण्यात भारत दुसर्या क्रमांकाचा देश कायम आहे. पहिल्या क्रमांकावर चीन आहे.
सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर या संस्थेने या संदर्भातील आकडेवारी संकलित केली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर भारताची रशियाकडून तेल खरेदी वेगात वाढून एकूण तेल आयातीच्या 40% वर गेली होती. त्यापूर्वी भारत मध्यपूर्वेतून जास्त प्रमाणात तेल खरेदी करत होता आणि आपल्या एकूण गरजेच्या केवळ एक टक्के तेल रशियाकडून खरेदी करीत होता. प्राप्त माहितीनुसार भारताने रशियाकडून सप्टेंबर महिन्यात एकूण 3.6 अब्ज युरोची तेल उत्पादने खरेदी केली. यामध्ये खनिज तेलाचा वाटा 77%, कोळशाचा वाटा 13% तर इतर उत्पादनांचा वाटा दहा टक्के इतका होता.
भारताने रशियाकडून सप्टेंबर महिन्यात प्रत्येक दिवसाला 1.6 दशलक्ष पिंप खनिज तेल खरेदी केले. सप्टेंबरच्या तुलनेत हे प्रमाण 9% कमी आहे. भारतातील सरकारी तेल कंपन्या रशियाकडून तेल खरेदी कमी केल्यामुळे हे प्रमाण कमी झाले आहे. सप्टेंबर महिन्यात चीनने रशियाकडून 5.5 युरोचे खनिज तेल खरेदी केले. रशियाच्या एकूण खनिज तेल खरेदीत चीनचा वाटा 42% इतका आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिका आणि युरापीयन देशानी रशियाकडून थेट खनिज तेल खरेदी बंद केली. त्यामुळे रशियाने पर्यायी बाजारपेठा शोधण्यासाठी खनिज तेल विक्रीवर बरीच सूट दिली होती. बाजारपेठेपेक्षा रशियन खनिज तेललाचा दर 20 डॉलरने कमी होता. याचा फायदा भारत चीन आणि तुर्कस्तानसारख्या देशांनी घेतला आणि रशियाकडून तेल खरेदी वाढविली होती.





