FIFA Rankings : अर्जेंटिनाचे वर्चस्व कायम, फ्रान्स दुसऱ्या तर भारतीय संघ ‘या’ स्थानावर कायम…

FIFA Rankings : भारतीय फुटबॉल संघ गुरुवारी जाहीर झालेल्या फिफा पुरुषांच्या क्रमवारीत 124 व्या स्थानावर कायम आहे, तर गतविजेता आणि कोपा अमेरिका विजेता अर्जेंटिनाने आपले अव्वल स्थान मजबूत केले आहे. जूनमध्ये जाहीर झालेल्या फिफा क्रमवारीत भारतीय पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघाची तीन स्थानांनी घसरण झाली होती. कतार आणि अफगाणिस्तान विरुद्ध 2026 विश्वचषक पात्रता फेरीच्या तिसऱ्या फेरीसाठी पात्रता मिळवण्यात त्यांना अपयश आल्याने भारताची क्रमावारीत घसणरण झाली होती.
गेल्या वर्षी डिसेंबरपासून भारताची क्रमवारीत घसरण सुरूच आहे. भारतीय संघ गेल्या वर्षी अव्वल 100 मध्ये पोहोचला होता ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम क्रमवारी 99 होती. पण तेव्हापासून भारताची क्रमवारीत सतत घसरण चालूच आहे. आशिया खंडात भारत 22 व्या स्थानावर कायम आहे. ज्यामध्ये संघ लेबनॉन, पॅलेस्टाईन आणि व्हिएतनामच्या मागे आहे.
अर्जेंटिनाने नुकत्याच झालेल्या कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद यशस्वीपणे राखून क्रमवारीतील अव्वल स्थानावरील आपली पकड आणखी मजबूत केली आहे. युरो कप 2024 च्या उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर फ्रान्स दुसऱ्या स्थानावर कायम आहे.
नुकतेच युरोपियन चॅम्पियन बनलेल्या स्पेनला पाच स्थानांचा फायदा झाला असून त्यांचा संघ तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यात पराभूत झालेल्या इंग्लंडने एका स्थानाने प्रगती करत चौथ्या स्थान मिळवताना ब्राझीलला मागे टाकले आहे. ब्राझीलचा संघ एक स्थान घसरून पाचव्या स्थानावर आला आहे. बेल्जियम सहाव्या, नेदरलँड सातव्या, पोर्तुगाल आठव्या आणि कोलंबिया नवव्या स्थानावर आहे.

