India Q3 GDP 2025 : भारताच्या जीडीपीत ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत केवळ 6.2% वाढ

नवी दिल्ली – तिसर्या तिमाहीत विविध क्षेत्रांची उत्पादकता कमी झाली आहे. त्यातल्या त्यात कारखाने आणि खान क्षेत्राची उत्पादकता घसरली आहे. यामुळे तिसर्या तिमाहीचा विकासदर कमी होऊन 6.2% इतका नोंदला गेला आहे. गेल्या वर्षी तिसर्या तिमाहीत विकासदर 9.5% होता. म्हणजे वार्षिक पातळीवर हा दर कमी झाला आहे. मात्र यावर्षी पहिल्या तिमाहीत म्हणजे सप्टेंबर अखेरच्या तिमाहित विकासदर केवळ 5.6% होता. तो तिसर्या तिमाहीत 6.2 टक्के नोंदला लागेल आहे. म्हणजे तिमाही पातळीवर विकासदर वाढला आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने चालू आर्थिक वर्षाचा विकासदर अंदाज किंचित वाढवून 6.5% इतका केला आहे. अगोदर हा अंदाज 6.4% होता. तिसर्या तिमाहीत मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता कोसळून 3.5% इतकी झाली आहे. गेल्या वर्षी तिसर्या तिमाहित उत्पादकता 14% इतकी होती. खान क्षेत्राची उत्पादकता केवळ 1.4% भरली आहे. जी की गेल्या वर्षी या तिमाहीत 4.7% होती.
बांधकाम क्षेत्राची उत्पादकता कमी होऊन सात टक्के झाली आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत बांधकाम क्षेत्राची उत्पादकता दहा टक्के होती. 2024- 25 या आर्थिक वर्षात राष्ट्रीय उत्पन्न 187.95 लाख कोटी रुपये भरण्याची शक्यता आहे.गेल्या वर्षी ही रक्कम 176.51 लाख कोटी रुपये होती. गेल्या वर्षाचा विकासदर 9.2% होता. तर या वर्षाचा विकास तर 6.5% भरण्याची शक्यता आहे.
एप्रिल ते डिसेंबर या कालावधीचा विकासदर 6.1% असल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी विभागाचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी या कालावधीत हा विकासदर 9.5% इतका होता. तिसर्या तिमाहीत विकासदर या अगोदर 5.4% जाहीर करण्यात आला होता. मात्र सुधारित आकडेवारीनुसार हा विकासदर 5.6% इतका करण्यात आला आहे.
दुसर्या तिमाहीत विकासदर कमी झाल्यानंतर अर्थ मंत्रालय आणि रिझर्व बँकेने विकास दर वाढवा यासाठी आणि उपाययोजना केल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात प्राप्तीकर उत्पन्न मर्यादा वाढवून 12 लाख रुपये केली आहे. तर रिझर्व बँकेने या महिन्याच्या सुरुवातीच्या काळात जाहीर केलेल्या पतधोरणात व्याजदर पाव टक्क्यांनी कमी केला आहे. आगामी काळातही अशा प्रकारच्या उपाययोजना करत राहण्याची गरज आहे.
कृषी क्षेत्र अपवाद
विविध क्षेत्रांची उत्पादकता कमी झाली असतानाच कृषी क्षेत्राची उत्पादकता मात्र तिसर्या तिमाहीत तब्बल 5.6% इतकी नोंदली गेली आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत कृषी क्षेत्राची उत्पादकता केवळ 1.5 टक्के होती. वीज निर्मिती, गॅस निर्मिती, पाणीपुरवठा इत्यादी क्षेत्रांची उत्पादकता 5.1% आहे. गेल्यावर्षी ही उत्पादकता 10.1% होती.
सेवा क्षेत्राची उत्पादकता समाधानकारक
दरम्यान सेवा क्षेत्रातील विविध घटकाची उत्पादकता काही प्रमाणात समाधानकारक पातळीवर असल्याचे चित्र दिसून येते. या विभागातील व्यापार, हॉटेल, वाहतूक, दूरसंचार, प्रसारण या क्षेत्रांची उत्पादकता 6.7% आहे. जी की गेल्या वर्षी आठ टक्के होती. वित्तीय सेवा, व्यावसायिक सेवा क्षेत्राची उत्पादकता 7.2% आहे. गेल्या वर्षी ही उत्पादकता 8.4% होती. लोकप्रशासन, संरक्षण आणि इतर सेवांची उत्पादकता 8.8% इतकी भरली आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत हे प्रमाण 8.4% इतके होते.





