जगभरात मंकीपॉक्सनं डोकं वर काढलं ! केंद्र सरकार सतर्क ; रुग्णालयांना निर्देश, विमानतळांवरही अलर्ट

India Prepares For MPOX । कोरोनानंतर आता मंकीपॉक्सनं जगाला धडकी भरवली आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सनं एकाच हैदोस घातला आहे. त्यातच आता हा मंकीपॉक्स कोरोनाप्रमाणेच जगाला विळखा घालणार की, काय? अशी भीती सर्वत्र निर्माण झाली आहे. मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचप्रमाणे केंद्र सरकारनेही देशात उपाययोजना करण्यास सुरूवात केलीय.
जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केले . त्यानंतर केंद्र सरकारनं खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही परिस्थिती पाहता आपत्कालीन वॉर्ड तयार केले जात आहेत आणि विमानतळांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.
केंद्राकडून रुग्णालयांना निर्देश India Prepares For MPOX ।
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून रुग्णालयांना निर्देश देण्यात आले आहेत. ज्या रुग्णांच्या शरीरावर पुरळ उठले आहेत, अशा रुग्णांची ओळख पटवून आयसोलेशन वॉर्ड तयार करण्याचे निर्देश सरकारनं रुग्णालयांना दिले आहेत. दिल्लीतील तीन प्रमुख रुग्णालये – सफदरजंग, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज आणि राम मनोहर लोहिया रुग्णालयांना हे निर्देश देण्यात आले आहेत.
संपूर्ण विमानतळांवरही अलर्ट India Prepares For MPOX ।
संशयित रुग्णांवर RT-PCR आणि नाकातील स्वॅब चाचण्या केल्या जातील. विमानतळांनाही आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेनं MPOX ला दुसऱ्यांदा जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केलं आहे. व्हायरसचा एक नवा प्रकार उदयास आला आहे, जो मागीलपेक्षा अधिक प्रभावी आहे आणि लैंगिक संपर्कासह, नियमित जवळच्या संपर्काद्वारे सहजपणे पसरत असल्याचं दिसतंय.
देशात नव्या व्हेरियंटची प्रकरणं नाहीत
भारतात आतापर्यंत MPox च्या नव्या स्ट्रेनचं कोणतंही प्रकरण नोंदवलं गेलेलं नाही. परंतु 16 ऑगस्ट रोजी, पाकिस्तानमध्ये तीन MPOX प्रकरण नोंदवलं गेलं, जी संयुक्त अरब अमिरातीतून आली होती. यापूर्वी स्वीडनमध्ये आफ्रिकेबाहेर एमपॉक्सची पहिली केस नोंदवण्यात आली होती.





