India Playing Eleven : किवीविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताच्या प्लेइंग ११ वरून मोठा गदारोळ! सिराज-जडेजाला वगळल्याने पेटला वाद
India Playing Eleven : भारतीय संघाच्या अंतिम ११ खेळाडूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याला प्रत्युत्तर देताना, फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक म्हणाले की, पाच दिवसांचे वेळापत्रक डोळ्यासमोर ठेवून संघाची निवड करण्यात आली आहे.

India Playing Eleven Controversy Siraj Jadeja Dropped Wellington Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनवरून क्रिकेट वर्तुळात मोठा गदारोळ माजला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आल्याने दिग्गजांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या जागी जसप्रीत बुमराहसोबत प्रसिध कृष्णा, आकाश दीप, अंशुल कंबोज आणि फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर यांना संधी देण्यात आली. किवी संघाची ५ बाद ७० अशी अवस्था झाल्यानंतर हेनरी निकोल्स आणि ग्लेन फिलिप्सने १७३ धावांची भागीदारी रचताच या निवडीवर टीकेची झोड उठली.
गावस्कर यांनी सिराजच्या निवडीवरून व्यक्त केले आश्चर्य, तर अश्विनचाही जोरदार टोला –
माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी सिराजला बाहेर ठेवण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले. सिराजने भारताला कधीही निराश केलेले नाही आणि त्याची लय उत्तम असताना त्याला का वगळले हे समजण्यापलीकडचे असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे, रविचंद्रन अश्विनने या निर्णयाला ‘अत्यंत कठोर’ संबोधत सोशल मीडियावरून निवड समितीच्या कार्यपद्धतीवर उपरोधिक टीका केली. समालोचक हर्षा भोगले यांनी सिराजच्या योगदानाची आठवण करून देत, त्याच्याशी स्पष्ट संवाद साधला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली. माजी सलामीवीर वसीम जाफर यांच्या मते, न्यूझीलंडच्या डावखुऱ्या फलंदाजांमुळे सुंदरची निवड समजू शकते, मात्र सिराजला बाहेर बसवणे अत्यंत धक्कादायक आहे.
फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी निवडीचे केले समर्थन –
भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी संघ व्यवस्थापनाच्या निर्णयाचे समर्थन केले. ते म्हणाले की, संघाने उपलब्ध पर्यायांमधून सर्वोत्तम संघ निवडला असून, सिराजला वगळण्यामागे त्याची कोणतीही खराब कामगिरी किंवा समस्या नव्हती. कोटक म्हणाले, “सिराजच्या बाबतीत काहीही चुकीचे नाही. संघ व्यवस्थापनाने या सामन्यासाठी सर्वोत्तम संभाव्य संघ निवडला आहे. श्रीलंकेतील परिस्थिती वेगळी होती आणि सिराजने तेथे दोन्ही कसोटी सामने खेळले होते.”
The blazer, the baggy blue, the walk and the toss 🔥
Captain @ShubmanGill leading the way at the Basin Reserve.
#NZvIND | #TeamIndia https://t.co/4BgO5w7SOi
— BCCI (@BCCI) November 19, 2026
व्यवस्थापनाचा विचार काय होता?
प्रसिध कृष्णा, आकाश दीप आणि अंशुल कंबोज यांची निवड त्यांच्या गोलंदाजीतील विविध क्षमता लक्षात घेऊन करण्यात आली. कोटक यांनी स्पष्ट केले की, संघाला असे गोलंदाज हवे होते जे सीम मूव्हमेंट, स्विंग आणि अतिरिक्त उसळीचा फायदा घेऊ शकतील. वेलिंग्टनची खेळपट्टी सुरुवातीला ओलसर आणि गवताळ होती, त्यामुळे उंच गोलंदाजाकडून अतिरिक्त उसळी मिळण्याची अपेक्षा होती.
जडेजाऐवजी वॉशिंग्टन सुंदरच्या निवडीबद्दल कोटक म्हणाले की, न्यूझीलंड संघात चार डावखुरे फलंदाज असल्यामुळे या ऑफ-स्पिनरला प्राधान्य देण्यात आले. त्यांनी हेही नमूद केले की, वॉशिंग्टनमध्ये फलंदाजीने योगदान देण्याची क्षमता होती. त्यांनी जडेजाचे वर्णन एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून केले, परंतु संघाला वाटले की या सामन्यासाठी हे संयोजन अधिक चांगले आहे. कोटक म्हणाले की, संघ निवडताना केवळ पहिल्या दिवसाचाच नव्हे, तर कसोटीच्या संपूर्ण चार-पाच दिवसांचा विचार केला जातो.





