शेअर व्यवहारावर भारत-पाक तणावाचे सावट; नफ्यासाठी बँका व तेल कंपन्यांच्या शेअरची विक्री

मुंबई – भारताची स्थूल अर्थव्यवस्था बळकट आहे. त्याचबरोबर जागतिक व्यापार युद्धाचा भारतावर कमी परिणाम होत असल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक उच्च पातळीवर आहेत. अशातच काही गुंतवणूकदारांनी बँका आणि तेल कंपन्यांच्या शेअरची विक्री करून नफा काढून घेतला. भारत- पाकिस्तान दरम्यानचा तणाव वाढत चालल्यामुळे काही गुंतवणूकदार नफा काढून घेत असलेले वातावरण शेअर बाजारात आहे.
परिणामी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 155 अंकांनी कमी होऊन 80,641 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 81 अंकांनी म्हणजे 0.33 टक्क्यांनी यांनी कमी होऊन 24,379 अकांवर बंद झाला. अमेरिकेच्या रिझर्व बँकचे पतधोरण लवकरच जाहीर होणार आहे. त्याचबरोबर अमेरिका -चीन दरम्यान प्रत्यक्ष -प्रत्यक्षरीत्या व्यापाराबाबत वाटाघाटीत चालू आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार कुंपणावर बसून असल्याचे चित्र बाजारात निर्माण झाले आहे.
असित सी मेहता इन्व्हेस्टमेंट इंटरमीडिएट या कंपनीचे उपाध्यक्ष ऋषिकेश एडवे यांनी सांगितले की, भारत – पाक तणावामुळे अस्थिरता निर्देशांक व्हीआयएक्स 3.58 टक्क्यांनी वाढून 19 या पातळीवर गेला आहे. अशा परिस्थितीत शेअर बाजारातील व्यवहारावर परिणाम झाला आहे. तांत्रिकदृष्ट्या निफ्टी परिस्थिती न बिघडल्यास 24,590 अंकापर्यंत वाढू शकतो. तर 24,300 पातळीवर निफ्टीला चांगला आधार आहे.
कोणत्या कंपन्या पिछाडीवर –
आजच्या विक्रीचा परिणाम ईटर्नल, टाटा मोटर्स, स्टेट बँक, अदानी पोर्टस्, एनटीपीसी, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, सनफार्मा या कंपन्यावर झाला. तर या परिस्थितीतही एअरटेल, टाटा स्टील, महिंद्रा, हिंदुस्तान युनिलीव्हर, मारुती या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.
जागतिक परिस्थिती –
चीनमधील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. दक्षिण कोरिया, जपानमध्ये शेअर बाजारांना सुट्टी होती. युरोपमधील आणि अमेरिकेतील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी पातळीवर होते. परदेशी गुंतवणूकदारांची भारतात खरेदी चालूच असून सोमवारी या गुंतवणूकदारांनी 497 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केली.
मॉकड्रिल सूचनेचा परिणाम –
गृह मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर देशातील महत्त्वाच्या तीनशे जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल करण्याची सूचना केली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये अशा सूचना देण्यात आली आहेत त्यामध्ये अणू केंद्र, लष्करी ठाणी, तेल शुद्धीकरण केंद्र, वीज निर्मिती केंद्र, धरण असलेल्या प्रदेशाचा समावेश आहे. जर तणाव वाढला तर नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याचा अपेक्षेप्रमाणे शेअर बाजाराच्या व्यवहारावर परिणाम झाला.





