नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्धबंदीची घोषणा झाल्याचा अनेक स्तरांमधून आनंद व्यक्त केला जातो आहे. देशातील तसेच परदेशातील नेत्यांनी या घोषणेचे स्वागत केले आहे. प्रादेशिक कमी होणे गरजेचे होते. दोन्ही देशांमधील संघर्षामुळे हा तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज देश असल्यामुळे या संघर्षाचे पर्यावसन व्यापक युद्धामध्ये झाले असते, तर ते कोणालाही लाभदायक ठरले नसते, अशी प्रतिक्रिया अनेक नेत्यांनी व्यक्त केली आहे. आम्ही या घटनाक्रमावर बारकाईने देखरेख करत आहोत. पण संघर्ष कमी करण्यासाठी केलेल्या सर्व प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो, असे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ऍन्टोनिओ गुटेरेस यांचे उपप्रवक्ते फरहान हक यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पयांच्या मध्यस्थीमुळे ही युद्धबंदी झाल्यामुळे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे शांततेचे अध्यक्ष आहेत, अशी प्रतिक्रिया अमेरिकेतील परराष्ट्र व्यवहार समितीने शनिवारी दिली. अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या प्रदीर्घ चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. दोन्ही देशांचे अभिनंदन. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद, असे समितीने सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ट्रम्प यांच्या टीमकडून, विशेषतः परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याकडून, उत्तम काम झाले आहे. भारत आणि पाकिस्तानच्या नेत्यांनी केलेल्या कठोर परिश्रम आणि या युद्धबंदीमध्ये सहभागी होण्याची तयारी दाखवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी.वान्स यांनी म्हटले आहे. तणाव कमी करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वरिष्ठ युरोपियन युनियन अधिकारी लष्करी कारवाई थांबवण्याबाबत सामंजस्य निर्माण करत आहेत, असे युरोपीय संघाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील आजचा युद्धबंदीचा करार अत्यंत स्वागतार्ह आहे. मी दोन्ही पक्षांना हे कायम ठेवण्याचे आवाहन करतो. तणाव कमी करणे सर्वांच्या हिताचे आहे, असे ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी म्हणाले.