वझिरीस्तानमधील आत्मघातकी हल्ल्यामागे भारताचा हात नाही; भारताने फेटाळला पाकिस्तान लष्कराचा दावा

नवी दिल्ली : पाकिस्तानमधील उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यात झालेल्या त्मघातकी बॉम्बस्फोटामागे भारताचा हात असल्याचा पाकिस्तान लष्कराने केलेला दावा भारताने सपशेल फेटाळून लावला आहे. पाकिस्तान लष्कराने केलेला हा दावा फेटाळण्यायोग्यच होता. त्यानुसार तो फेटाळला जात आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैयस्वाल यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
खैबर पख्तूनख्वा येथील उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यातील खादी भागात शनिवारी पहाटे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात १६ पाकिस्तानी सैनिक ठार झाले आणि १९ नागरिकांसह २९ जण जखमी झाले. सुरक्षा दलाच्या वाहनावर स्फोटकांनी भरलेले वाहन धडकवून हा स्फोट घडवून आणण्यात आला होता. या स्फोटानंतर या ठिकाणी बेछुट गोळीबार झाल्याचेही वृत्त आहे.
तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानशी संलग्न असलेल्या हाफिज गुल बहादूर गटाचा एक उपगट असलेल्या उसुद अल-हर्ब संघटनेने या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दक्षिण वझिरीस्तानमध्ये गुप्तचरांच्या माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या ऑपरेशन दरम्यान ११ दहशतवाद्यांचा खात्मा झाला तर दोन सैनिक ठार झाले होते. त्यानंतर काही दिवसांतच हा हल्ला झाल्याचे पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले आहे.
या घटनेला अलिकडच्या काही महिन्यांतील उत्तर वझिरीस्तानमधील सर्वात प्राणघातक हल्ला म्हटले जाते. गेल्या महिन्यात, पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात असलेल्या किला अब्दुल्लाह येथील गुलिस्तान परिसरात एका कार बॉम्बस्फोटात किमान चार जणांचा मृत्यू झाला आणि २० हून अधिक जण जखमी झाले.





