‘इंदिरा होणे सोपे नाही’, दिल्लीत काँग्रेस मुख्यालयाबाहेर होर्डिंग

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. काहीजण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कमकुवत ठरवत असताना, काहीजण याला भारताची रणनीती मानत आहेत. याचवेळी काँग्रेसने १९७१ चा दाखला देत इंदिरा गांधी यांच्या कणखर नेतृत्वाचा उल्लेख केला आहे. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाबाहेर ‘इंदिरा होणे सोपे नाही’ आणि ‘भारताला इंदिरा यांची आठवण येते’ असे होर्डिंग लावण्यात आले आहे. यात इंदिरा गांधी यांच्यासह काँग्रेस नेते अक्षय लाकडा आणि उदय भानू यांचे फोटो आहेत.
काँग्रेसच्या अधिकृत एक्स हँडलवर इंदिरा गांधी आणि माजी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचा फोटो शेअर करत लिहिले आहे, “इंदिरा गांधी यांनी निक्सन यांना सांगितले होते, आमची कणा ताठ आहे. आमच्याकडे इच्छाशक्ती आणि संसाधने आहेत. कोणत्याही अत्याचाराचा सामना आम्ही करू शकतो.” काँग्रेसने याला खऱ्या अर्थाने भारतासाठी ठामपणे उभे राहण्याचे उदाहरण म्हटले.
#WATCH दिल्ली: कांग्रेस मुख्यालय के बाहर ‘इंदिरा होना आसान नहीं’ और ‘भारत को इंदिरा की याद आती है’ नारे वाले होर्डिंग लगाए गए। pic.twitter.com/TDHk80xMS8
— ANI_HindiNews (@AHindinews) May 11, 2025
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्याने भारताने पाकिस्तानला जबाबदार ठरवले होते. यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत ६-७ मे रोजी पाकिस्तान आणि पीओकेमधील अनेक ठिकाणांवर हल्ले केले. यामध्ये दहशतवादी तळ उद्धवस्थ करत 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर पाकिस्ताननेही नियंत्रण रेशेवर गोळीबार तीव्र केला, ज्यात १६ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. ८ मे रोजी पाकिस्तानने ३००-४०० ड्रोनद्वारे भारताच्या लष्करी पायाभूत सुविधांवर हल्ल्याचा प्रयत्न केला, परंतु भारताने तो हाणून पाडला.
शनिवारी सायंकाळी ५:३० वाजता अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केली. भारत आणि पाकिस्तान यांनी १२ मे रोजी दुपारी १२ वाजता डीजीएमओ बैठक घेण्याचे मान्य केले आहे. भारताने आतंकवादाविरुद्ध कठोर भूमिका कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.





