Shreyas Iyer : वेस्ट इंडिजकडून भारताचा 24 धावांनी पराभव; श्रेयस अय्यरने सांगितली पराभवाची कारणं म्हणाला…
Shreyas Iyer : सामना गमावल्यानंतर भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने पराभवाची कारणं स्पष्ट केली. भारतीय गोलंदाजांना योग्य टप्प्यावर आणि अचूक दिशा राखून गोलंदाजी करता आली नाही, अशी खंत त्याने व्यक्त केली.

Shreyas Iyer : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. वेस्ट इंडिजने भारतावर २४ धावांनी विजय मिळवत मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत २४७ धावांचा डोंगर उभारला. या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला २२३ धावांपर्यंतच मजल मारता आली.
गोलंदाजांच्या कामगिरीवर श्रेयस अय्यर नाराज
सामना गमावल्यानंतर भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने पराभवाची कारणं सांगितली. भारतीय गोलंदाजांना योग्य टप्प्यावर आणि अचूक दिशा राखून गोलंदाजी करता आली नाही, अशी खंत त्याने व्यक्त केली. श्रेयस अय्यर म्हणाला, “आमच्या पराभवाची सुरुवात गोलंदाजीपासूनच झाली. आम्हाला योग्य टप्प्यावर आणि अचूक दिशा राखून गोलंदाजी करता आली नाही. जेव्हा तुम्हाला २५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असतो, तेव्हा ठरावीक रणनीतीनुसार खेळणं आवश्यक असतं. लक्ष्याचा पाठलाग करताना आमच्या फलंदाजांचा दृष्टिकोन मला आवडला. मात्र, गोलंदाजी करताना आम्ही आखलेल्या योजनांची योग्य अंमलबजावणी करू शकलो नाही. त्यामुळेच आम्हाला पराभव स्वीकारावा लागला.”
भारतीय गोलंदाजांची महागडी गोलंदाजी
या सामन्यात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. मोठ्या फटक्यांच्या जोरावर त्यांनी धावांचा वेग कायम ठेवत २४७ धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. मयंक यादव आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी चार षटकांत मिळून तब्बल १०४ धावा दिल्या. नमन धीरनेही एका षटकात १९ धावा खर्च केल्या. प्रिन्स यादव, अक्षर पटेल आणि नितीश कुमार रेड्डी यांनाही वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना रोखण्यात अपेक्षित यश मिळालं नाही.
मालिकेत रंगत वाढली; पुढील सामना निर्णायक
भारतीय फलंदाजांनी लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली झुंज दिली. मात्र गोलंदाजांनी दिलेल्या अतिरिक्त धावांचा आणि मोठ्या धावसंख्येचा दबाव कमी करता आला नाही. परिणामी भारताला २४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे पुढील सामन्यात भारतीय संघाकडून कशी रणनिती आखली जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.






